पुणे : दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी गर्दी होत असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातून प्रवाशांसाठी ५९८ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. १५ ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी होणारी गर्दी पाहून वेळापत्रकाचे नियोजन करण्यात येणार आहे. स्वारगेट, शिवाजीनगर या प्रमुख स्थानकांसह पिंपरी-चिंचवड स्थानकातूनही वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या सोडल्या जाणार आहेत.
शहरात नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि उद्योगधंद्यानिमित्त स्थलांतरित नागरिकांची संंख्या अधिक आहे. रेल्वे आरक्षण पूर्ण झाले असून, खासगी बस प्रवासी वाहनांकडून जास्त दर आकारले जातात. त्यामुळे नागरिक हे एसटी बसचा पर्याय निवडतात. त्यानुसार पुणे विभागाकडून यंदाही जादा बस सोडण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड स्थानकातून सर्वाधिक ३९६ बस सोडल्या जाणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी स्वारगेट एसटी स्थानक येथून नियमित बसबरोबरच १२२ बस सोडण्यात येणार आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात जाणाऱ्या गाड्या स्वारगेट स्थानकातून मार्गस्थ होतील. शिवाजीनगर स्थानकातून ८० बस सोडल्या जाणार आहेत.
गाड्यांसाठी भाडेपट्ट्यावर मोकळी जागा ताब्यात
प्रत्येक वर्षी खडकी कटक मंडळातून (कँटोन्मेंट) मराठवाडा, विदर्भ, खान्देश येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा बस सोडण्यात येत होत्या. मात्र, खडकीची जागा योग्य नसल्यामुळे यंदा एसटी महामंडळाकडून वाकडेवाडी बस स्थानकाची जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, ही जागा ‘पीएमआरडीए’च्या ताब्यात असून, त्यांच्याकडूनही नकार आल्याने एसटी महामंडळाने पिंपरी-चिंचवड आगारातून जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भाडेपट्ट्यावर मोकळी जागा एसटी महामंडळाने घेतली आहे. त्यामुळे प्रवाशांना सहज सेवा उपलब्ध होणार असल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
दिवाळीनिमित्त पुणे विभागातून ५९८ गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नियमित एसटी त्यांच्या वेळेनुसार धावणार आहेत. विशेष म्हणजे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे यंदा भाडेवाढ करण्यात आलेली नाही. – अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे
बसस्थानक आणि बस संख्या
शिवाजीनगर – ८०
स्वारगेट – १२२
पिंपरी-चिंचवड – ३९६
एकूण – ५९८