पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम पूर्णत्वास आले असल्याचे सांगत ‘दिवाळी २०२५ पर्यंत मेट्रो सुरू होईल’ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या वर्षी दिले होते. परंतु, यंदा दिवाळीत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला न झाल्याने मोहोळ यांना प्रश्न विचारले जात आहेत. तसेच समाज माध्यमावरही ( सोशल मिडिया) मोहोळ यांना ‘ट्रोल’ म्हणजेच तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे.

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो हा पुण्यातील तिसरी मेट्रो मार्गिका असून, हा मार्ग हिंजवडी आयटी पार्कला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडतो. हा मार्ग सुमारे २३ किलोमीटर लांबीचा असून, यात २३ स्थानकांचा समावेश आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीएतर्फे राबविण्यात येत आहे. कामाच्या सुरुवातीला हा प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होईल आणि दिवाळी २०२५ पर्यंत प्रवासी सेवा सुरू होईल, असे मुरलीधर मोहोळ यांनी २०२४ मध्ये समाज माध्यमांवर जाहीर केले होते.

सध्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शेवटच्या टप्प्यात मार्गाचे संरेखन आणि काही तांत्रिक तपासणी सुरू आहे. तथापि, उद्घाटनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तांत्रिक चाचणी, सुरक्षा मंजुरी आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक प्रमाणपत्रे मिळविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, समाज माध्यमांवर अनेक नागरिकांनी मंत्री मोहोळ यांची जुनी पोस्ट शेअर करून त्यावर टीका केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘दिवाळी आली पण मेट्रो नाही आली!’ तर दुसऱ्याने उपहासाने म्हटले, ‘शिवाजीनगर ते हिंजवडी प्रवास अजूनही पीएमपीएमएल बसवरच!’ या सर्व प्रतिक्रियांमुळे प्रशासन आणि प्रकल्प व्यवस्थापनावर जनतेचा रोष दिसून येत आहे.

हिंजवडी आयटी पार्क परिसरात दररोज लाखो कर्मचारी प्रवास करतात. शिवाजीनगर ते हिंजवडी प्रवासास अनेक वेळा एक ते दीड तास लागतो. मेट्रो सुरू झाल्यास हा प्रवास २० ते २५ मिनिटांत पूर्ण होईल असा अंदाज आहे. मेट्रो मार्गिकेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक अडचणी आणि अंतिम सुरक्षा तपासण्या सुरू आहेत. लवकरच उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाईल, अशी भूमिका पीएमआरडीएने घेतली आहे. परंतु अधिकृतपणे कधी मेट्रो सुरू होईल याबाबत स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेले नाही.

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो हा पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. परंतु वेळोवेळी दिलेली आश्वासने आणि न पाळलेले वेळापत्रक यामुळे नागरिकांकडून या प्रकल्पाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. राजकीय आश्वासने आणि प्रत्यक्ष प्रगती यात मोठे अंतर असल्याचे हे उदाहरण ठरले आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी दिवाळीपूर्वी सुरू करण्याचे आश्वासन अपूर्ण राहिले आहे. यामुळे मोहोळ यांना त्यांनीच दिलेले आश्वासन अडचणीचे ठरले आहे.

दिवाळी संपली मोहोळ साहेब. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उड्डाणपुलासारखीच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रखडली आहे. तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. योगेश जोशी ( निवृत्त लेफ्टनन्ट कर्नल), माजी सचिव, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन