पुणे : आंबट गोड चवीच्या रसाळ नागपूर संत्र्यांचा हंगाम सुरू झाला असून, यंदा हवामान बदलामुळे नागपूर संत्र्यांचा हंगाम दीड महिने उशिराने सुरू झाला आहे. ‘छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यात संत्र्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या भागातील संत्री-मोसंबी वर्षभर उपलब्ध असतात. नागपूर संत्री चवीला आंबट गोड आणि रसाळ असतात. आकारने नागपूर संत्री मोठी असतात, तसेच रंग पिवळशर केशरी असतो.

नागपूरमधील संत्री दिसायला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. नागपूरमघील संत्र्यांचा हंगाम हवामान बदलांमुळे यंदा लांबणीवर पडला आहे. ढगाळ हवामानामुळे रंग आणि गोडीवर परिणाम झाला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्यातील संत्री चवीला आंबट आहेत,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळ व्यापारी करण जाधव यांनी दिली.

‘नागपूर संत्र्यांचा हंगाम दरवर्षी साधारणपणे तीन महिने सुरू राहतो. यंदा हंगाम साधारणपणे दीड महिने सुरू राहणार आहे. यंदा पाऊस चांगला झाला. परतीची पावसामुळे संत्र्यांचे नुकसान झाले. नागपूर, अमरावती जिल्ह्यात संत्र्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पावसामुळे फळधारणेवर परिणाम झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात नागपूर संत्र्यांची आवक सुरू झाली आहे. रविवारी (२६ ऑक्टोबर) बाजार आवारात ७०० पेट्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार संत्र्याच्या आठ ते अकरा डझनाच्या पेटीला घाऊक बाजारात ८०० ते ११०० रुपये दर मिळाला’, असे जाधव यांनी सांगितले.

सतत पडणाऱ्या पावसामुळे संत्र्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी फार काळ संत्र्यांची साठवणूक करता येत नाही. खरेदीदारांकडून कमी प्रमाणावर खरेदी होत आहे. नागपूर, परतवाडा, अंजनगाव, अचलपूर, वरुड, चिखली अमरावती भागातून संत्र्यांची आवक होत आहे. – करण जाधव, फळ व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड