पुणे : नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. भरधाव वेग आणि ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने एकापाठोपाठ ट्रकने वाहनांना धडक दिली. अपघात करणाऱ्या ट्रकने बाह्यवळण मार्गावरुन मुंबईकडे निघालेल्या ‘सीएनजी किट’ बसविलेल्या मोटारीला पाठीमागून धडक दिली. मोटारीच्या पुढे आणखी एक ट्रक होता. मधोमध मोटार सापडल्याने मोटारीने पेट घेतल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर अपघात करणाऱ्या ट्रक चालकासह मदतनीसासह (क्लिनर) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या अपघातात ट्रक चालकासह दोघांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातात मोटारीतील पाच प्रवासी, तसेच एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, नऊ ते दहा जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अपघाताची माहिती मिळताच गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन ट्रकच्या मधोमध मोटार होती. मोटार पेटली होती. ट्रकने मोटारीला धडक दिल्यानंतर मोटार दुसऱ्या एका ट्रकच्या मधोमध सापडली होती. मोटारीला धडक देणाऱ्या ट्रकमध्ये लोखंडी साहित्य होते. हे साहित्य घेऊन ट्रक मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन मुंबईकडे निघाला होता. ट्रक चालक भरधाव वेगात दरी पूलाकडून नवले पुलाकडे निघाला होता. याच परिसरात ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे शक्यता आहे. ट्रक वाहनांना धडक देऊन पुढे निघाला होता. वाहनांना धडक देत निघालेल्या ट्रकमधून घर्षणामुळे ज्वाळा निघत होत्या, असे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसून आले आहे’, असे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.
‘मोटारीत पाच प्रवासी होते. त्यात एका लहान मुलाचा समावेश होता. जेव्हा ट्रकने मोटारीला धडक दिली. तेव्हा मोटारीतील सीेनजी पुरवठा सुरू होता. सीएनजी किट मोटारीच्या मागील बाजूस होते. ट्रकच्या धडकेत सीएनजी किटने पेट घेतला. मोटार दोन ट्रकच्या मधोमध होता. घर्षणामुळे ट्रकमधून ज्वाळा निघत होत्या. मोटारीने पेट घेतल्याने काही क्षणात आग भडकली’, असे निरीक्षण पोटफोडे यांनी नोंदविले.
नवले पूल दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. मोटारीतील गंभीर होररळलेल्या पाच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. ट्रकमधील ठेवलेले अवजड लोखंडी साहित्य मोटारीत शिरले होते. शर्थीचे प्रयत्न करुन जवानांनी अपघातात होरपळलेल्या मोटारीतील पाच जणांना बाहेर काढले. – देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी
