महापालिकेच्या अंदाजपत्रकात आपापल्या प्रभागात जास्त निधी आणण्यासाठी संघर्ष करावा लागे. त्यावेळी केवळ नगरसेवक म्हणून कामे होत नसत. संघर्ष करून प्रभागात निधी आणावा लागायचा. मी, रामभाऊ मोझे आणि शशिकांत सुतार प्रभागात कामे व्हावीत म्हणून संघर्ष करायचो. आम्हा तिघांची तळमळ पाहून शरद पवार पुणे महापालिकेतील सोनेरी टोळी असे आम्हा तिघांना प्रेमाने संबोधायचे.

सन १९७४ पासून अपक्ष, त्यानंतर जनता पक्ष, शरद पवारांचा काँग्रेस पक्ष, अपक्ष, काँग्रेस आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांकडून सहा वेळा मी निवडून आलो. नगरसेवक म्हणून अडोतीस वर्षे निवडून येत होतो. घोरपडी पेठ, ताडीवाला रस्ता, लष्कराचा अलीकडील भाग हे माझे कार्यक्षेत्र होते. माझा प्रभाग हा बहुजनबहूल आणि रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला होता. मी अपक्ष म्हणून उभा राहिलो तरी लोक महात्मा फुले यांचा वंशज म्हणून मला मते देत असत आणि मी भरघोस मतांनी निवडून येत असे. केवळ माळी समाजाचा म्हणून मते न देता माझे काम, जनतेप्रती असलेली तळमळ पाहून लोकांनी मला सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले.

प्रभागात पाण्यासाठी खूप लांब जावे लागायचे तसेच त्या काळी जेथे पाणी उपलब्ध होते, तेथे हंडय़ापाठीमागे दहा रुपये घेतले जायचे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी संघर्ष केला आणि प्रभागात पाणी उपलब्ध करून दिले. तसेच प्रभागातील लोकांच्या घरी शौचालय नसल्याने ते रस्त्यावरच शौचालयाला बसायचे. त्यामुळे प्रभागात स्वच्छतागृहे बांधून दिली. सन १९७९ साली पीएमटीचा अध्यक्ष, त्यानंतर शिक्षण मंडळावर दोन वेळा असे चौदा वर्षे अध्यक्ष म्हणून आणि स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करता आले. त्या काळी महापौरपदासाठी खूप चुरस असायची. बहुमत असूनही पक्षाचा उमेदवार पराभूत व्हायचा. अशा वातावरणात १९८६-८७ ला महापौर म्हणून निवडून आलो. सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो. मात्र, खर्च कधीच साडेपाच हजारांच्या पुढे गेला नाही. एक भेळेचे पोते आणले की झाले. त्यामध्ये कार्यकर्ते खूष असायचे त्यांची कोणतीही अपेक्षा नसायची. एक नळ बसवला की शंभर मते घट्ट व्हायची. त्या काळी जातीचे राजकारण नव्हते, लोक कामांवर मते द्यायचे.

शरदराव पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मला बोलावून घेतले. मी त्यांना आम्हा पती-पत्नीला उमेदवारी देणार असाल तरच काँग्रेसमध्ये येतो असे सांगितले. त्यांनीही उमेदवारी दिली. कलमाडी यांनी शेट्टी, काझी या पती-पत्नीला उमेदवारी दिली. मात्र, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे निवडून आलो आणि महाराष्ट्रात प्रथमच पती-पत्नी असे एकत्र नगरसेवक म्हणून महापालिकेत दाखल झालो. माझा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यानंतर मी राजकारणापासून वेगळा झालो.

उल्हास ऊर्फ नाना ढोले पाटील

महापौर, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, स्थायी समितीचे अध्यक्ष, पीएमटीचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली आहेत.