पुणे : ‘जी-२०’ परिषदेच्या बैठकीनिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरातील सुशोभीकरणाच्या कामांवर आक्षेप नोंदविण्यात आला असून आयुक्त विक्रम कुमार भारतीय जनता पक्षासाठी काम करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सोमवारी केली. जी-२० परिषदेच्या निमित्ताने भाजपचे पाच वर्षांतील अपयश पुढे आले असून कामांची पोलखोल केली जाईल, असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


हेही वाचा >>> पुणे : थंडी कायम,पण लवकरच तापमानवाढ; उत्तरेकडील थंडीची लाट घटणार

‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने जगभरातील वीस देशांचे प्रतिनिधी आणि मंत्री गटाची बैठकीला पुण्यात प्रारंभ झाला आहे. या बैठकांसाठी महापालिकेकडून गेल्या काही महिन्यांपासन शहराच्या विविध भागात सुशोभीकरणाची कामे करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहराच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रशांत जगताप यांनी भाजपवर टीका केली. खासदार ॲड. वंदना चव्हाण आणि प्रवक्ते प्रदीप देशमुख या वेळी उपस्थित होते.

परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहराचे १५ दिवसांत रूप बदलण्याचा प्रयत्न पुणे महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु ज्या २० देशांतील प्रतिनिधी भारतात येणार आहेत त्यांना दाखवण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून जो काही रात्रंदिवस विकास सुरू आहे, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप आहे. पाच वर्षांतील सत्ताकाळातील अपयश झाकण्यासाठीची पडदे लावण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. शहरातील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल यांची घाईगडबडीमध्ये रंगरंगोटी करण्यात आली. कित्येक ठिकाणी गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच राडारोडा उचलला गेला. कित्येक ठिकाणी राडारोडा उचलता न आल्याने पडदा टाकून कचरा झाकण्यात आलेला आहे. हा सर्व प्रकार करून पाहुण्यांच्या डोळ्यातच धूळफेक केली जात आहेत, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा >>> राजस्थानी समाजाच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; पुणे ते जोधपूर रेल्वे दररोज सुरू करण्याची मागणी

ते म्हणाले, की आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर, राज्यातील सर्वाधिक जीएसटी देणाऱ्या पहिल्या पाच शहरांपैकी एक शहर, आयटी हब, राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात नियमितपणे कर भरणाऱ्या पुणेकरांच्या सोयीसाठी ज्या गोष्टी गेल्या ५ वर्षांत केल्या गेल्या नाहीत, त्या गोष्टी पाहुण्यांसाठी केल्या जात आहेत. ठरावीक पक्षाचा लोगो, पक्षाच्या नेत्यांचे फोटो डोळ्यासमोर ठेवत करण्यात आलेली रंगरंगोटी ही अक्षरशः हास्यस्पद आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींचे अपयश झाकण्यासाठी महानगरपालिका आयुक्त हा खटाटोप करत आहेत. या निकृष्ट दर्जाच्या कामांची पोलखोल राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp raise objection on beautification work in pune city ahead of g 20 summit pune print news apk 13 zws