पुणे : राज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीसाठी नेट, सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीने पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. प्राध्यापकभरतीचा शासन निर्णय प्रसिद्ध होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका समितीने घेतली आहे.राज्यातील अनुदानित महाविद्यालयांत प्राध्यापकांची ५ हजार १२ पदे भरण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. तसेच या भरतीचा शासननिर्णय प्रसिद्ध करण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते.
मात्र, दोन महिन्यांनंतरही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्राध्यापक भरतीचा शासननिर्णय प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे नेट, सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीने शिवाजीनगर येथील उच्च शिक्षण संचालनालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
महाविद्यालयात प्राध्यापकच नसल्यास राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० यशस्वीपणे कसे राबवणार हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्राध्यापक भरती होण्याची आवश्यकता आहे, असे समितीचे राज्य समन्वयक ओंकार कोरवले यांनी सांगितले.