पुणे : ‘बाहेर खाणे त्याज्य मानले जात होते अशा काळात म्हणजे शंभर वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत आजोबांनी उपाहारगृह सुरू केले. तेव्हा टि‌ळक रस्त्यावर न्यू पूना काॅलेज होते. त्यावरूनच आजोबांनी ‘न्यू पूना बोर्डिंग हाऊस’ असे नामकरण केले. चार तपांपूर्वी वडिलांना मदत करण्याच्या उद्देशातून मी या व्यवसायात आलो. पूर्वी पाटावर बसून जेवणारे ग्राहक आता डायनिंग टेबल पद्धतीने खुर्चीवर बसून भोजनाचा आस्वाद घेतात. हाच काय तो बदल. पदार्थांची चव पूर्वी होती तशीच आताही आहे. खाद्यसंस्कृतीवर प्रेम करणारे पुणेकर हेच आमचे ‘ब्रँड ॲम्बेसिडर’ आहेत. अशा पुणेकरांची सेवा करण्याचे भाग्य जीवनाच्या अखेरपर्यंत लाभू दे’, अशी कृतज्ञ भावना ’न्यू पूना बोर्डिंग हाऊस’चे संचालक सुहास उडपीकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

उत्कृष्ट खाद्यसेवा पुरविणाऱ्या ‘न्यू पूना बोर्डिंग हाऊस’च्या शताब्दीपूर्तीनिमित्त आडकर फाउंडेशनतर्फे सुहास उडपीकर यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी उडपीकर बोलत होते. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद आडकर, मैथिली आडकर या वेळी व्यासपीठावर होत्या. उडपीकर यांच्या मातोश्री पद्मजा तसेच पत्नी सपना यांचा सत्कार करण्यात आला.

‘माझं एक लग्न झालं आहे. आता तुझ्याशी करतो आहे’, असे विवाहाच्या वेळी मी पत्नीला सांगितले तेव्हा पहिल्यांदा तिला समजले नाही. पण, नंतर तिला हळूहळू समजू लागले. कोणतीही तक्रार न करता तिने मला प्रोत्साहन दिले, असे उडपीकर यांनी सांगितले.

‘स्वयंपाक झाल्यानंतर पहिल्यांदा आमचे कर्मचारी जेवण करतात. त्यामुळे आपोआप गुणवत्ता नियंत्रणाचे काम साधले जाते. आमच्याकडे भपका नाही. पण, गोडी आणि आत्मीयता आहे,’ अशी वैशिष्ट्ये त्यांनी उलगडली.  

जोशी म्हणाले, अन्नब्रह्माची सेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले याचा आनंद आहे. उत्तम सेवा देत माणसांशी स्नेह जोडण्याचे काम उडपीकर यांनी केले. जागतिकीकरणानंतर एकूणच जागतिक जीवनशैलीत जे बदल झाले त्याचे परिणाम स्थानिक भाषा आणि संस्कृती यावरही झाले आहेत. खाद्यसंस्कृतीही त्याला अपवाद नाही. अशा परिस्थितीत आणि स्पर्धेत आपली मराठमोळी खाद्य संस्कृती जपायला आणि टिकवायला हवी. शतकपूर्ती केलेल्या न्यू पूना बोर्डिंग हाऊसने ती जपली आहे. त्याला आदरातिथ्याची जोड मिळाल्याने गेले शतकभर ग्राहकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. अन्य राज्यांमध्ये मराठी खाद्यपदार्थ मिळत नाहीत हे वास्तव आहे. त्यासाठी मराठी व्यावसायिकांची समाधानी वृत्ती कशी दूर करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. दिखाऊपणाच्या काळात अशी टिकाऊ स्थाने आपण टिकवून ठेवली पाहिजेत.’

इटकर म्हणाले, ‘न्यू पूना बोर्डिंग हाऊसमधील भोजन हे उर्जा पुरवणारे केंद्र आहे. खाद्यपदार्थांच्या दर्जातील सातत्य आणि गुणवत्तेशिवाय संस्थेची शताब्दी शक्य नाही. समाधानी आणि आनंदी ग्राहक जपणारी ही अभिमानास्पद वाटचाल आहे.’

उत्तरार्धात ‌‘आपण सारे खवय्ये‌’ या विषयावरील कविसंमेलनात स्वप्नील पोरे, सुजित कदम, शोभा शेट्टीवार, मीना सातपुते, उज्ज्वला सहाणे, डॉ. रेवा देशमुख, राजश्री सोले, हेमंत केतकर, स्वाती दाढे, प्रतिभा पवार, मीनाक्षी नवले, प्रभा सोनवणे, प्रतिमा जोशी, शैलजा किंकर यांचा सहभाग होता. तनुजा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.