वाहन क्रमांकाचा फलक न वापरणाऱ्या दुचाकीस्वाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून पकडले. या अट्टल वाहनचोराकडून  साडेचार लाख रुपये किंमतीच्या नऊ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाधान गणपत जगताप (वय २८, रा. यवत, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जगताप हा सराईत गुन्हेगार असून त्याने लोणी काळभोर, लोणीकंद, कोथरूड, यवत, कोंढवा, अलंकार, हडपसर पोलीस ठाण्याअंतर्गत केलेले वाहनचोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. 
गुन्हे शाखेतच्या युनिट सहाचे पथक हद्दीमध्ये गस्त घालत असताना संशयीत आरोपी जगताप याच्याकडे विना वाहन क्रमांकाच्या संशयित दुचाकी असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

त्यानुसार पथकाने जगतापला मांजरी परिसरात सापळा लावून पकडले. गाडीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला. कसून चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. जगतापला अटक करून आणखी तपास करण्यात आला. त्याने चोरलेल्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine bikes seized from thieves in pune print news amy