पुणे : ‘हिंदी सक्तीविरोधात मुंबईच्या मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढण्याऐवजी ठाकरे बंधूंनी महमद अली रस्ता, बेहराम पाड्यातून मोर्चा काढावा. ‘हिंदूं’मध्ये फूट पाडण्यापेक्षा मुंबई-महाराष्ट्रात राहून ज्यांना मराठी बोलता येत नाही, त्यांना आधी मराठी शिकवा,’ अशी टीका राज्याचे मत्स्य आणि बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.

ओडिशामधील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन पुणेच्या वतीने रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेत मंत्री राणे सहभागी झाले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी गुरुवारी (५ जुलै) संयुक्त मोर्चाची हाक पुकारली होती. राणे म्हणाले, ‘जावेद अख्तर, आमीर खान आणि राहुल गांधींसाठी हिंदी सक्ती महत्त्वाचा मुद्दा नाही का? त्यांना आधी मराठीत बोलायला लावा. राज्यात हिंदी सक्तीची नाहीच. हा केवळ हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. पहिलीच्या विद्यार्थ्याला तृतीय भाषा म्हणून संस्कृतचाही पर्याय उपलब्ध आहे.’

‘राणेंवर खुनाचा गुन्हा नाही’

भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नीतेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांच्याविरुद्ध कोणताही खून प्रकरणाचा गुन्हा नोंद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोगावले यांना प्रत्यक्ष भेटून अधिक माहिती देणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.