पुणे : अहमदाबाद येथील विमानतळाजवळ घडलेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या दोन विमानांना रात्री उशिरापर्यंत उड्डाणाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे प्रवासी विमानतळावरच थांबले आहेत.
नागरी हवाई वाहतूक संचालनालय (डीजीसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. पुणे विमानतळ प्रशासनाकडून देखील अद्ययावत माहिती प्रवाशांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अहमदाबाद विमानतळावर उतरण्यासाठी जागा मिळेल, तेव्हाच पुणे विमानतळावरून विमानाचे उड्डाण होणार असल्याची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाने दिली. पुणे विमानतळावरून दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी आणि सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी अहमदाबादकडे निघणारी दोन नियमित प्रवासी विमाने रखडली आहेत. या दोन्ही फ्लाइट्सना अहमदाबाद विमानतळावर तात्पुरती बंदी असल्याने परवानगी मिळालेली नाही. अपघातग्रस्त विमानाच्या स्थलांतरणाचे काम सुरू असल्याने सर्व आगमन व प्रस्थान उड्डाणांत तात्पुरता बदल करण्यात आला आहे, अशी प्राथमिक माहिती आहे.