मावळ गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याविषयी पिंपरी पालिकेचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तथापि, शासनाकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणी देणाऱ्या बंदनळयोजनेला विरोध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बऊर येथे पोलिसांनी गोळीबार केला होता, त्यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेस ९ ऑगस्टला दोन वर्षे पूर्ण झाले. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकसत्ता’ ने प्रसिद्ध केले. तत्कालीन परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पिंपरी पालिकेत नोकरी देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात तशी कृती झाली नाही. यासंदर्भात, आयुक्तांनी पिंपरी पालिकेची भूमिका स्पष्ट केली. त्या वारसांना नोकरी देण्याचा प्रस्ताव ऑगस्ट २०११ मध्येच पाठवण्यात आला असून सातत्याने स्मरणपत्रे दिली आहेत. मात्र, शासनाकडून उत्तर मिळत नाही. नियमानुसार त्या वारसांना अनुकंपा तत्त्वावरही भरती करता येत नाही. शासनाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No response from govt about giving job to maval victim heir