पुणे : देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. या योजनेतील स्वयंसेवकांची संख्या २५ लाखांनी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, अद्याप एनएसएस विभाग स्थापन झालेला नसलेल्या विद्यापीठांनी एनएसएस विभाग स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे.
‘यूजीसी’ने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. तरुणांमध्ये समाजसेवा, नेतृत्त्वगुण, सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालयाची राष्ट्रीय सेवा योजना १९६९ मध्ये सुरू करण्यात आली. एनएसएस उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना अमूल्य जीवनकौशल्ये आत्मसात करता येतात, राष्ट्रउभारणी, सामाजिक कर्तव्यांची समज निर्माण होते.
देशभरात ‘एनएसएस’चे सुमारे ३९ लाख स्वयंसेवक कार्यरत आहेत. क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयाकडून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एनएसएस स्वयंसेवकांची संख्या आणखी २५ लाखांनी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या देशातील ५९४ विद्यापीठांमध्ये कार्यरत असलेले एनएसएस विभाग विद्यार्थ्यांना समाज विकासासाठी रचनात्मक मंच उपलब्ध करून देत असल्याचे ‘यूजीसी’ने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर, अद्याप ज्या विद्यापीठांनी एनएसएस विभागाची स्थापना केलेली नाही, त्या ठिकाणी एनएसएस विभाग स्थापन करावेत. त्यामुळे संबंधित संस्थांतील विद्यार्थ्यांनाही एनएसएस उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळून ते समाजविकास व राष्ट्रनिर्मितीत हातभार लावू शकतील. त्या दृष्टीने विद्यापीठांनी ‘एनएसएस’च्या विस्ताराच्या मोहिमेत सहकार्य देण्याची अपेक्षा ‘यूजीसी’कडून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात स्वयंसेवक वाढवण्याचा प्रस्ताव
राज्यात ‘एनएसएस’चे १ लाख ८० हजार स्वयंसेवक वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्यात आला आहे. तसेच खासगी विद्यापीठांनाही एनएसएसशी जोडून घेण्यात येत आहे. स्वयंनिर्वाही तत्त्वावरील एनएसएस एकक सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती ‘एनएसएस’चे राज्य समन्वयक अजय शिंदे यांनी दिली.