शिरुर: घोड धरणातील गाळ काढण्याच्या नावाखाली धरणातील वाळु उपसा करण्यासाठी लिलाव करण्यास हरकत असून या संदर्भात जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन दिले असल्याची माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष उद्योग आघाडी संजय पाचंगे यांनी दिली .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांनी सांगितले की  शिरुर तालुक्यात घोड धरण हे अतिशय जुने असुन धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळुचा साठा साठलेला आहे.प्रशासनाच्या सहकार्याने वारंवार या धरणातुन बेकायदेशीर वाळु उपसा होतच असतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

परंतु घोड धरणातील या वाळुवर अनेक वाळु माफीयांचा डोळा असुन धरणातील गाळ काढण्याच्या नावाखाली धरणातील वाळु उपसा करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजले आहे.धरणातील गाळ काढायचा असेल तर सध्याचा पाण्याचा साठा कमी करावा लागण्याची शक्यता असुन यावर्षी तीव्र  उन्हाळा असणार आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे.

गाळ काढायचा असेल तर प्रथम किती लांबीत गाळ साठलेला आहे, गाळ काढल्यानंतर पाणीसाठा किती वाढणार आहे, सदर गाळ काढण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, सदर गाळात वाळुचा किती साठा आहे, याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात यावा. गाळ काढण्यासाठी कोणताही लिलाव न करता फक्त शेतक-यांना तेही मर्यादीत नेण्याची परवानगी द्यावी. त्यासाठी नेलेल्या गाळाची विक्री करणार नसल्याची अट घालुन फक्त शेती वापरासाठी तेही मागणी करणार्‍या शेती क्षेत्रानुसार ठरविण्यात यावी. जर सदर गाळाची विक्री केल्याचे निष्पन्न झाले तर दंडाची रक्कम ठरविण्यात यावी.

याबाबत कोणताही निर्णय घेताना जनतेसह जे जे तक्रारदार असतील, नदी प्रेमी, निसर्ग प्रेमी व धरणग्रस्त शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते, प्रमुख राजकीय पदाधिकारी यांची जाहीर संयुक्त खुली बैठक आयोजित करावी अशी मागणी शासनाकडे केली असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Objection to auctioning sand from the dam in the name of removing silt from ghod dam bjp state vice president sanjay pachange pune print news amy