पुणे : करोना संकटानंतर कार्यालयीन जागांच्या मागणीत सुरू झालेली वाढ कायम आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांत कार्यालयीन जागांच्या भाड्यात वाढ सुरूच आहे. मुंबईत ही वाढ सर्वाधिक २८ टक्के असून, पुण्यात ११ टक्के आहे. देशभरात बहुराष्ट्रीय कंपन्यांची जागतिक सुविधा केंद्रे (जीसीसी) कार्यालयीन जागांच्या मागणीला गती देत आहेत.

अनारॉक ग्रुपने देशातील कार्यालयीन जागांचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात देशातील महानगरांचा विचार करण्यात आला आहे. या अहवालानुसार, करोना संकटावेळी कार्यालयीन जागांच्या मागणीत घट झाली होती. करोना संकटानंतर हे चित्र बदलले आणि कार्यालयीन जागांना मागणी वाढली. सध्या जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वारे असले, तरी कार्यालयीन जागांना मागणी कायम आहे. यामुळे कार्यालयीन जागांच्या भाड्यातही वाढ होत आहे. मुंबईत ही वाढ सर्वाधिक असून, त्याखालोखाल दिल्ली आणि हैदराबादमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे.

मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), लोअर परळ आणि अंधेरी पूर्व परिसराला कंपन्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. मुंबईत २०२२ मध्ये कार्यालयीन जागेचे दरमहा भाडे १३१ रुपये प्रतिचौरसफूट होते, ते २०२५ मध्ये १६८ रुपयांवर पोहोचले आहे. पुण्यात हे भाडे २०२२ मध्ये ७२ रुपये होते आणि २०२५ मध्ये ते ८० रुपयांवर गेले. दिल्लीत हे भाडे २०२२ मध्ये ९२ रुपये होते आणि ते २०२५ मध्ये ११० रुपये झाले. बेंगळुरूमध्ये हे भाडे २०२२ मध्ये ८२ रुपये होते आणि ते २०२५ मध्ये ९५ रुपयांवर गेले. हैदराबाद आणि चेन्नईत हे भाडे २०२२ मध्ये अनुक्रमे ५८ रुपये आणि ६६ रुपये होते. दोन्ही महानगरांत हे भाडे २०२५ मध्ये ७२ रुपयांवर पोहोचले, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘जीसीसी’साठी सर्वाधिक मागणी

बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जागतिक सुविधा केंद्रांकडून (जीसीसी) कार्यालयीन जागांना जास्त मागणी दिसून येत आहे. यंदा पहिल्या तिमाहीत ‘जीसीसी’साठी ८३.५ लाख चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली. त्यात दिल्लीतील जागेचे प्रमाण सर्वाधिक २३ टक्के होते. देशातील प्रमुख सात महानगरांतील गेल्या दोन वर्षांत कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर घेण्यात ‘जीसीसी’चा वाटा ३७ टक्के आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

देशभरातील कार्यालयीन जागांचे चित्र

मुंबई – वित्तीय, माहिती तंत्रज्ञान, नवउद्यमी कंपन्यांकडून मागणी जास्त.

पुणे, चेन्नई – माहिती तंत्रज्ञान आणि निगडित सेवा कंपन्यांचे प्रमाण अधिक.

दिल्ली – नोएडा, गुरुग्रामध्ये पायाभूत सुविधा क्षेत्राचा जास्त भर.

हैदराबाद – माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विस्तारामुळे मागणीत वाढ. बेंगळुरू – जागतिक पातळीवरील कंपन्यांची वाढती पसंती.