पुणे : टँकरच्या चाकाखाली सापडून दीड वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वारजे भागातील गणपती माथा परिसरात घडली. याप्रकरणी टँकर चालकाला अटक करण्यात आली असून, टँकर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधोक्षक महेश वहाळे (वय १८ महिने) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी टँकर चालक सनी प्यारे बारसकर (वय ३३, सध्या रा. वडाचा गणपती मंदिराजवळ, दत्तवाडी, मूळ रा. भैय्यावाडी, सहापूर, जि. बैतुल, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत सतीश वसंत टिकारे (वय ६५, रा. टिकारे हाईट्स, गणपती माथा, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील गणपती माथा परिसरातील रहिवासी छाया वहाळे यांचा नातू अधोक्षक शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरासमोर खेळत होता. या परिसरातील एका इमारतीतील टाकीत पाणी भरण्यासाठी टँकर आला होता. त्या वेळी टँकर मागे नेत असताना घरासमोर खेळणारा अधोक्षक मागच्या चाकाखाली सापडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर रहिवाशांनी टँकर चालक बारसकर याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. टँकर चालक बारसकर याला ताब्यात घेण्यात आले. बारसकर याला अटक करण्यात आली असून, टँकर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One and a half year old child died after being run over by tanker in warje driver arrested pune print news sud 02