लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : केंद्र सरकारने कांद्यावर किमान निर्यात मूल्य लागू करून कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. पण, कांद्यावर नेमका किती निर्यात शुल्क आकारायचा या बाबत ठोस दिशानिर्देश केंद्र सरकारकडून सीमा शुल्क विभागाला मिळालेले नाहीत. त्यामुळे अद्याप कांदा निर्यात सुरू होऊ शकली नाही.

केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या परदेशी व्यापार विभागाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी आणि वाणिज्य विभागाच्या सचिव नीता खरे यांनी चार मे रोजीच्या दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात त्या बाबतचे लेखी आदेश व्यापारी आणि सीमा शुल्क विभागाला मिळालेले नाहीत. त्यामुळे चार मेपासून कागदोपत्री कांदा निर्यात खुली झाली असली तरीही प्रत्यक्षात कांदा निर्यात सुरू झालेली नाही.

आणखी वाचा-विदर्भात गारपिटीचा इशारा… कुठे होणार गारपीट?

लासलगाव येथील कांदा निर्यातदार मनोजकुमार जैन म्हणाले की, ‘कांद्यावर नेमका किती निर्यात शुल्क आकारायचा या बाबत सीमा शुल्क विभागाला केंद्राचे आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे कांद्यावर निर्यात शुल्क आकारायचा का आणि किती आकारायचा या बाबत सीमा शुल्क विभागच संभ्रमात आहे. तसेच निर्यातदार व्यापाऱ्यांनाही जसे ५५० डॉलर्स प्रतिटन किमान निर्यात शुल्काबाबतचे स्पष्ट दिशानिर्देश मिळालेले आहेत, तसे स्पष्ट दिशानिर्देश निर्यात शुल्काबाबत मिळालेले नाहीत. त्यामुळे व्यापारीही संभ्रमात आहे. निर्यातबंदी उठवताच निर्यातदार निर्यातीसाठी सज्ज झाले आहेत. कांदा भरलेले कंटेनर नाशिकमधील बाजार समित्या आणि मुंबईतील बंदराबाहेर उभे आहेत. पण, निर्यात शुल्काचा संभ्रम दूर न झाल्यामुळे अद्याप निर्यात होऊ शकलेली नाही.’

निफाड येथील कांदा निर्यातदार अक्षय सांगळे म्हणाले की, ‘निर्यातबंदी उठवली असली तरीही कांद्यावर निर्यात शुल्क नेमका किती भरायचा आहे, या बाबत व्यापाऱ्यांना अधिकृतरित्या काहीही कळविण्यात आलेले नाही. सीमा शुल्क विभागाकडूनही ठोस माहिती मिळत नाही. त्यामुळे अद्याप कांदा निर्यात सुरू होऊ शकलेली नाही. या बाबत आज, सोमवारी मुंबईत एक बैठक झाली आहे. पण, बैठकीतील निर्णय अद्याप समजू शकला नाही.’

आणखी वाचा-आरोग्य तपासणी करणारे ‘हेल्थ एटीएम’! पुण्यातील वढू बुद्रुकमध्ये अनोखी सुविधा सुरू

कांदा भरलेले ट्रक बंदराबाहेर

कांदा निर्यातीवर नेमका किती निर्यात शुल्क आकारायचा या बाबत पुरेशी स्पष्टता नाही. त्यामुळे व्यापारी आणि सीमा शुल्क विभागही संभ्रमात आहे. या बाबतचे स्पष्ट आदेश येत नाहीत, तोपर्यंत कांदा निर्यात सुरू होणार नाही. कांदा भरलेले कंटेनर मुंबईत बंदराबाहेर उभे आहेत, अशी माहिती लासलगाव येथील कांदा निर्यातदार मनोजकुमार जैन यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion export dilemma continues traders and customs department confused about export duty pune print news dbj 20 mrj