पुणे : पदवीधर मतदार संघासाठी १ जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर अपलोड केलेली कागदपत्रे तपासणी मात्र ऑफलाइनच (प्रत्यक्ष नोंदणी अधिकाऱ्याकडे) केली जात आहे. या प्रक्रियेसाठी अद्याप प्रमाणित संचालन पद्धत (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर – एसओपी) तयार झालेली नाही. त्यामुळे नोंदणी ऑनलाइन झाली, तरी मतदार नोंदणी प्रक्रिया अद्यापही ऑफलाइनच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्य़ात पदवीधर मतदार संघासाठी ५२ हजार ८४९ आणि शिक्षक मतदार संघासाठी १८ हजार ३८६ मतदारांची यादी झाली आहे. दोन्ही मतदार संघांच्या निवडणुका जुलै २०२० मध्ये होणार आहेत. त्यामुळे १ जानेवारी २०२० पासून ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदारांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. या कालावधीत आलेले अर्ज तपासून संबंधित मतदारांची नावे पुरवणी यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. पुरवणी यादीसाठी १ जानेवारीपासून सुरुवातीला पदवीधरसाठी ऑनलाइन मतदार नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी पोर्टल खुले करण्यात आले आहे. दरम्यान, पूर्वीच्या पदवीधर मतदार संघाच्या यादीत नाव असले, तरीही संबंधित मतदारांना मतदार नोंदणीसाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तसेच निवडणुकीसाठीही नव्याने मतदार म्हणून नावनोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नेमकी समस्या काय?
पदवीधर, शिक्षक मतदार संघांच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारित होत आहेत. देशभरात ज्या ठिकाणी विधानपरिषद अस्तित्वात आहे. त्या ठिकाणी या निवडणुका होत असतात. यापूर्वी या मतदार संघांसाठी ऑनलाइन मतदार नोंदणीची सुविधा नव्हती, ती यंदा प्रथमच सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही सुविधा निवडणूक आयोगाकडून संपूर्ण देशभरात लागू करावी लागणार आहे. त्याकरिता प्रमाणित संचालन पद्धती अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे १ जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणीची सुविधा सुरू झाली असली, तरी कागदपत्रे तपासणीसाठी संबंधित मतदाराला प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त संजयसिंह चौहान यांनी दिली.
ऑनलाइन नोंदणीसाठी पोर्टल
पदवीधर मतदार संघासाठी १ जानेवारीपासून ऑनलाइन मतदार नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरिता ceo.maharashtra.gov.in/gonline हे पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यावर जाऊन आपली माहिती भरून आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर सध्या संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन कागदपत्रांची शहानिशा करावी लागते. या निवडणुका जुलै महिन्यात होणार असल्याने येत्या एक-दीड महिन्यात ऑनलाइन मतदार नोंदणी प्रक्रिया परिपूर्ण होणार असल्याचा दावा विभागीय आयुक्तालयाकडून करण्यात आला.