लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये पाचवी आणि आठवीसाठीची नोंदणी १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत करता येणार आहे. ही नोंदणी सुविधा जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या मूल्यमापन सत्रासाठी असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन नावनोंदणी करता येईल.

मंडळाचे सचिव माणिक बांगर यांनी ही माहिती दिली. औपचारिक शिक्षण न घेतलेल्या म्हणजे पूर्वी शाळेत न गेलेल्या किंवा शाळा अर्धवट सोडलेल्या घटकांना मुक्त विद्यालय मंडळाअंतर्गत इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी समकक्ष परीक्षेसाठी संपर्क केंद्रांमार्फत नाव नोंदणी करता येते. या परीक्षांना शासनाच्या नियमित परीक्षांची समकक्षता आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येईल.

आणखी वाचा-पुणे : विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

२ ते २० सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्क आणि मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे आवश्यक आहे. २९ सप्टेंबर रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे, यादी विभागीय मंडळात जमा करायच्या आहेत. अधिक माहिती https://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.