लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : शहरातील २५ लाख जुन्या वाहनांपैकी केवळ पाऊणेदोन टक्केच वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) लावल्याचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. शुक्रवारपर्यंत केवळ ४५ हजार वाहनांना पाटी बसवून झाली आहे, तर अडीच लाख वाहनधारकांनी नोंदणी केली असून, ते पाटी लावण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ३० एप्रिलपर्यंत ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ लावणे बंधनकारक करण्यात आले होते. पुणे शहरातील वाहनांसाठी रोस्मार्टा कंपनीची नियुक्ती करत वाहनचालकांना तातडीने संबंधित पाटी लावण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे निर्माण होत असलेला अडथळा, नोंदणीसाठी प्रतीक्षा, बनावट संकेतस्थळे यामुळे गैरसोय झाली.

तसेच, सुरुवातीच्या काळात अवघी ५९ केंद्रे सुरू करण्यात आली. पाटी बसविण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्याने नोंदणीत वाढ झाली. परंतु, केंद्रांवर कुशल मनुष्यबळाचा अभाव असल्याने पाटी बसविण्यासाठी विलंब होत असल्याने वाहनचाचक आणि केंद्रचालकांमध्ये वादावादीच्या घटना घडल्या. त्यामुळे ‘आरटीओ’ने कंपनीला केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत निर्देश दिल्यानंतर १२५ केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र, वादावादीच्या घटना घडत असल्याने एक-दोन केंद्रचालकांनी केंद्रच बंद केले. परिणामी, नोंदणीधारकांची संख्या वाढत गेली, तर तुलनेत पाट्या बसविण्याचे प्रमाणेत अत्यंत तुरळक असल्याचे स्पष्ट झाले.

पुणे शहरात एक एप्रिल २०१९ पूर्वीची २५ लाखांहून अधिक वाहने असून, शुक्रवारपर्यंत सुमारे दोन लाख ४० हजार वाहनचालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी केवळ ४५ हजार ५०० वाहनांना पाटी बसविण्यात आली आहे, उर्वरीत एक लाख ९५ हजार ५०० वाहनचालक प्रतीक्षेत असल्याची माहिती ‘आरटीओ’ प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्यासाठी वाहनचालकांचा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. दरम्यान, कंपनीलाही केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी सूचना करण्यात आल्या असून, प्रादेशिक परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार दोन महिन्यांची (३० जूनपर्यंत) मुदत वाढवून देण्यात आली आहे. वाहनचालकांनी लवकर पाटी बसवून घ्यावी. -स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

  • पुणे शहरातील जुनी वाहने – २५ लाख
  • नोंदणी केलेली वाहने – २,४०,५०० (९.६२ टक्के)
  • पाट्या बसविलेली वाहने – ४५,५००(१.८२ टक्के)
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only 45 thousand vehicles get high security number plates in a month pune print news vvp 08 mrj