पुणे : ‘दूध डेअरी, मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन आदी व्यवसायांमधून ग्रामीण भागात उद्योजक घडविण्यासाठी लवकरच योजना जाहीर केली जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा झाली असून, मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर योजना जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी येथे दिली.
पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद झाली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाचे सचिव डाॅ. रामास्वामी एन., आयुक्त डाॅ. प्रवीणकुमार देवरे या वेळी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, ‘पशुसंवर्धन विभाग ग्रामीण भागात उद्योजक निर्माण करणारा मुख्य विभाग आहे. ग्रामीण भागाबरोबरच तो शहरी भागाशीही निगडित आहे. त्यामुळे ग्रामीण भागात उद्योजक निर्माण करण्यासाठी लवकर योजना जाहीर केली जाणार आहे. वाढत्या दूध भेसळींच्या तक्रारीसंदर्भात कडक कारवाई करण्याची सूचना करण्यात आली असून, त्या संदर्भात लवकरच धोरण तयार केले जाणार आहे.’ ‘कथित गोरक्षकांकडून गायी नेणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक करून पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यासंदर्भात बोलताना त्यांनी, ‘अशा स्वयंघोषित गोरक्षकांची तपासणी करून कारवाई केली जाईल. गोवंश हत्या बंदी कायदा शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी नाही,’ असेही स्पष्ट केले.
‘मी सर्व राजकीय घराण्यांना जवळची’
गेल्या काही दिवसांपासून पवार आणि ठाकरे कुटुंबीय एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात मुंडे यांच्याकडे विचारणा केली असता, त्या म्हणाल्या, ‘मी सर्व राजकीय घराण्यांना जवळची आहे. कोणी एकत्र यावे न यावे, या संदर्भात कोणाला सल्ला देण्याएवढी मी मोठी नाही. मात्र सर्वांनी आपापल्या ठिकाणी आनंदात राहावे.’