पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी ‘स्पंदन’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात वाचन आणि गणिताबरोबरच मुलांचा भावनिक विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती आणि निर्णय क्षमतेसारख्या मूलभूत जीवन कौशल्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’द्वारे मूल्यमापन करण्यात आले. त्यात महापालिकेच्या केवळ १२ टक्के विद्यार्थ्यांनी निर्णय घेण्याशी संबंधित प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. तर, ४२ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना स्व-जागरूकता, गंभीर विचार आणि निर्णय घेणे यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्तरे देण्यात अडचणी आल्याचे दिसून आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी शिक्षण विभागाने ‘स्पंदन’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात वाचन आणि गणिताबरोबरच मुलांचा भावनिक विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
हा उपक्रम सर्व १४० महापालिका शाळा आणि २११ बालवाड्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. पूर्वप्राथमिक ते इयत्ता दहावीपर्यंतच्या ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे, असे शिक्षण विभागाने सांगितले. उपक्रमासाठी २१ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. हे शिक्षक इतर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेत आहेत.
विद्यार्थ्यांचा केवळ अभ्यासक्रमातच नव्हे, तर आयुष्यातही विकास व्हावा, हा उपक्रमामागचा उद्देश आहे. यातून मुलांमध्ये भावनिक समृद्धी, सामाजिक भान आणि आत्मविश्वास विकसित होईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सांगितले.
विविध उपक्रमांचे आयोजन
बालवाडी ते पाचवी पर्यंतच्या वर्गातील शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. वर्षभर मासिक शिक्षक समूह सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामुळे संपूर्ण शालेय शिक्षण पद्धतीमध्ये सकारात्मक बदल होण्यास मदत होईल. हा अभ्यासक्रम स्वतःच विद्यार्थ्यांसाठी खूप आकर्षक आहे. यात विद्यार्थ्यांना भावनिक जाणीव, कृतज्ञता आणि सामाजिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी “माइंडफुल सोमवार”, “थँक्सफुल गुरुवार” आणि “फ्रेंडली शुक्रवार” असे वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत.
स्पंदन उपक्रमासाठी २१ शिक्षकांची निवड
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महापालिकेने सहानुभूती, संवाद कौशल्य, विचारपूर्वक निर्णय क्षमता आणि समग्र शिक्षणाची जाणीव अशा महत्त्वाच्या गुणांवर लक्ष केंद्रित करत २१ शिक्षकांची निवड केली आहे. हे शिक्षक आता “एसईई लाईफ स्किल्स मास्टर ट्रेनर्स” म्हणून ओळखले जातात. ते इतर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेत आहेत. नुकताच ज्ञान प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये मास्टर ट्रेनर्सनी सहभाग नोंदवला. मास्टर ट्रेनर्सनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून, विद्यार्थ्यांना निर्णय क्षमता, स्वावलंबन यांसारख्या प्रमुख कौशल्यांचा विकास करण्याबाबत मार्गदर्शन केले.