पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड शहरामध्ये ऐन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सर्व्हिसिंग सेंटरमधील ३५ ते ४० इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३ च्या सुमारास वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. बजाज कंपनीच्या इथर इलेक्ट्रिक दुचाकीच्या सर्व्हिसिंग सेंटरमधील दुचाकींना आग लागल्याने ३५ ते ४० दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. पत्र्याच्या शेडमध्ये हे सर्व्हिसिंग सेंटर सुरू होते.
ऐन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी वाकड पोलीस दाखल झाले आहेत. रात्री उशिरा अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. ही घटना बॅटरीचा स्फोट झाल्याने घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
