पिंपरी : विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय साहित्य देणार असल्याची घोषणा करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शाळा सुरू होऊन दोन महिने झाल्यानंतर साहित्याचे वाटप पूर्ण केले. महापालिका शाळांमधील ५७ हजार ५६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ४२ हजार ७७०, तर तिसऱ्या टप्प्यात १४ हजार ७९० विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा असून यामध्ये ५७ हजार ५६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरद्वारे (डीबीटी) पैसे दिले जात होते. मात्र, पालकांच्या खात्यावर दिलेल्या पैशांतून विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केली नसल्याचा शिक्षण विभागाचा दावा आहे. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षापासून निविदा प्रक्रिया राबवून पुरवठादारांकडून शालेय साहित्य खरेदी केले जाते. हे साहित्य वितरित करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण पद्धती अंतर्गत ‘ई-रुपी’ या नवीन कार्य पद्धतीचा अवलंब केला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने डिजिटल ई-रूपी पेमेंट प्रक्रिया राबविल्यामुळे साहित्य वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आली. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली. या प्रक्रियेत निधी थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचला. या प्रक्रियेमुळे मध्यस्थ किंवा कागदी प्रक्रियेमधील विलंब टाळला गेला. प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य लवकर मिळण्यास मदत झाल्याचा दावा शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी केला.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील म्हणाले, ‘ई-रूपी पेमेंट प्रक्रियेमुळे वितरण कार्य वेगवान झाले. पालकांमध्येही विश्वास वाढला. लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी थेट पोहोचल्यामुळे महापालिकेच्या सेवांबाबत पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाची प्रतिमा अधिक बळकट झाली. मुलांना वेळेत शालेय साहित्य मिळाले. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अडथळ्याविना झाली.’