पिंपरी : स्वच्छ सर्वेक्षणात २०२४-२५ मध्ये देशात सातवा आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात कचरा कुंडीमुक्त शहर योजना अपयशी ठरली आहे. शहराच्या कोणत्याही भागात गेले, तरी रस्त्याच्या कडेला अथवा पूर्वी ज्या भागात कचराकुंडी होते, तेथे कचऱ्याचे ढीग पाहण्यास मिळत आहेत.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड महापालिका सहभागी झाली आहे. शहर स्वच्छतेबाबत ‘इंदूर पॅटर्न’ राबविला जात आहे. १८ मीटर पुढील रस्त्यांची साफसफाई यंत्राद्वारे केली जात आहे. घरोघरच्या कचरा संकलनाचे काम ठेकेदारांमार्फत सुरू आहे. ओला, सुका, प्लास्टिक, घातक, वैद्यकीय अशा पाच प्रकारे वर्गीकरण केलेला कचराच स्वीकारला जात आहे. कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृतीही केली जात आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये शहर कचरा कुंडीमुक्त करण्याच्या उपक्रमांतर्गत शहरातील ठिकठिकाणच्या कचरा कुंड्या हटविण्यात आल्या. पण, नागरिकांकडून कचरा उघड्यावरच टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने कचरा व्यवस्थापनाचे आव्हान कायम आहे. निगडी, आकुर्डी, चिखली, पिंपरीतील नेहरूनगर, मोशी, तळवडे, पिंपळे गुरव येथील रामकृष्ण चौक, लक्ष्मीनगर, गणपती विसर्जन घाट, राजीव गांधी वसाहत, वैदू वस्ती, जवळकरनगर, सुदर्शन चौक, त्रिमूर्ती चौक, सृष्टी चौक आदी ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग लागलेले दिसून येत आहेत. विविध उपनगरांत ठिकठिकाणी कचऱ्याचे साचलेले ढीग दररोज पाहावयास मिळत आहेत. कचऱ्यामुळे साथीचे आजार, डास, दुर्गंधी याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी कचरा
महापालिका, नगर परिषदेने कचरा कुंडीमुक्तीसाठी शहरातील कचरा कुंड्या हटविल्या. पण, कचरा कुंड्या नसल्याने रात्री काही नागरिक महामार्गाच्या कडेला कचरा टाकतात. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना कचरा टाकला जात असल्याने जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तळेगाव-दाभाडे ते देहूरोडपर्यंत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. प्रवाशांना कचऱ्याची दुर्गंधी सहन करावी लागते. तळेगाव दाभाडे-चाकण महामार्गाच्या दोन्ही बाजूंनाही कचरा दिसतो.
कचरा संकलनाच्या गाड्या येण्याची वेळ निश्चित नसते. नागरिक कामावर गेल्यानंतर कचरा कोण टाकणार, असा प्रश्न निर्माण होतो. त्यातच महापालिकेने सर्वच कचरा कुंड्या हलविल्या आहेत. त्यामुळे नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे, पूर्वी जिथे कचरा कुंड्या होत्या, तिथे कचऱ्याचे साम्राज्य दिसते. महापालिकेने हा कचरा नियमितपणे उचलावा. – रहिवासी, नेहरूनगर.
नागरिक रस्त्यावर कचरा टाकताना आढळल्यास आरोग्य, पर्यावरण विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येते. उघड्यावर कचऱ्या टाकण्याऱ्यांवर नियमितपणे कारवाई सुरू आहे. – हरविंदर बन्सल, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.