पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये त्रिकोणी प्रेमप्रकरणातून प्रेयसी महिला आणि प्रियकराची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी दत्तात्रेय साबळेला अटक केली आहे. दत्तात्रेय साबळे हा ठेकेदार आहे. तो बांधकामाचे ठेके घेतो. मंगला सूरज टेंभारे आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत.

हत्या झालेल्या मंगलाचे जगन्नाथ सरोदे आणि दत्तात्रेय साबळे या दोघांसोबत प्रेमसंबंध होते. रात्री उशिरा मंगला आणि जगन्नाथ एकत्र आले होते. त्याच वेळेत आरोपी दत्तात्रेय साबळे देखील तिथं पोहचला. दोघांना एकत्र बघून आरोपी दत्तात्रेयला राग अनावर झाला, त्यांच्यात वाद झाले. याच वादातून दत्तात्रेय याने दगडाने ठेचून दोघांची हत्या केली. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळवडे परिसरात ही घटना घडलेली आहे. मंगलाचा विवाह झालेला आहे. हत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी दत्तात्रेय साबळे याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.