पिंपरी : डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या किटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने घरे, कंटेनर, बांधकाम स्थळे अशा ८१ लाख ३२ हजार ८९ ठिकाणांची तपासणी केली. त्यांपैकी बारा हजार ८१४ ठिकाणी डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. त्यातील तीन हजार ९५३ जणांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. ९८८ नागरिक व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली असून ३५ लाख ८१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. शहरातील ८१ लाख ३२ हजार ८९ घरांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी १२ हजार ८१४ घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. ४३ लाख ३२ हजार ५३० कंटेनरपैंकी १३ हजार ८६४ कंटेनरमध्ये डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. एक हजार ९९९ बांधकाम स्थळी पाणी साचल्याचे निदर्शनास आले. एक हजार ७०३ भंगार दुकानांचीही तपासणी करण्यात आली. नियमित औषध फवारणी, शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती प्रशिक्षण, प्रभागस्तरावर विशेष जनजागृती कार्यक्रम आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबविल्या जात असल्याचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
कुंड्यांमध्येच निर्माल्य टाकण्याचे आवाहन
नदीकाठावर कुठल्याही प्रकारचा प्लास्टिक कचरा अथवा विघटन न होणारे साहित्य टाकू नये. यासाठी प्रत्येक विसर्जन स्थळी निर्माल्य संकलनासाठी विशेष कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. फुले, माळा, पूजेचे साहित्य व इतर जैविक कचरा फक्त या कुंड्यांमध्येच टाकावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
औषध फवारणी, आरोग्य तपासण्या, औषध उपचार यांसह सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरात पाणी साचू देऊ नये आणि स्वच्छता राखावी. डेंग्यू सदृश लक्षणे दिसल्यास त्वरित महापालिका रुग्णालयाशी संपर्क साधावा. – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका