पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल आणि आठही क्षेत्रीय कार्यालयांकडून फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात येत आहे. आतापर्यंत ६८ व्यावसायिकांनी परवानगी घेतली आहे. विनापरवाना फटाका स्टॉलवर महापालिका प्रशासनाची नजर राहणार आहे.

विनापरवाना उभारलेल्या स्टॉलवर कारवाईचा इशारा अग्निशमन दलाने दिला आहे. सोमवारपर्यंत शहरातील विविध भागांतून फटाका स्टॉलसाठी ६८ जणांनी परवानगी घेतली आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी स्टॉलशेजारी वाळू ठेवावी. फटाका स्टॉल परिसरात, बिडी, सिगारेट पेटवू नये. स्टॉल परिसरात ज्वलनशील पदार्थ ठेवू नये, फटाका स्टॉलपासून लहान मुलांना दूर ठेवावे, एक ते पाच हजार लिटर पाण्याची व्यवस्था ठेवावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

अग्निशमन दलाने दोन हजार २०० रुपये परवानगी शुल्क आकारून ६८ फटाका स्टॉलधारकांना परवानगी दिली आहे. व्यावसायिकांनी फटाका स्टॉल उभारण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे सहायक आयुक्त उमेश ढाकणे यांनी सांगितले.