पिंपरी : पिंपरीतील संत तुकारामनगर येथील एका महाविद्यालयाच्या फ्रेशर पार्टीवरून झालेल्या वादामुळे एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी (२८ जुलै) घडली.
याबाबत एका विद्यार्थ्याने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याचा मित्र नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आले होते. दोन आरोपींनी फ्रेशर पार्टीला जाण्यावरून वाद घातला. त्याला शिवीगाळ केली. सकाळी साडेअकरा वाजता महाविद्यालय सुटल्यानंतर प्रवेशद्वारावर त्यांच्या ओळखीचे अन्य मित्रांनी यांनी तक्रारदाराला बोलावून घेतले. त्यांपैकी एकाने तक्रारदाराच्या अंगावर त्याच्या ताब्यातील दुचाकी घातली. एकाने लोखंडी कोयता डोक्यात आणि डाव्या हाताला मारून त्याला गंभीर जखमी केले. तसेच तक्रारदाराच्या जुन्या घराशेजारी राहणारा एकानेही त्याच्या ताब्यातील दुचाकी अंगावर घातली. त्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातात असलेला लोखंडी कोयता पाठीवर मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर “आम्ही या महाविद्यालयाचे भाई आहोत” असे ओरडत, कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केली आणि तेथून निघून गेले. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.
काळेवाडीत खंडणीसाठी नारळ विक्रेत्याला धमकी
नारळाच्या गोडाऊनमध्ये एका नारळ विक्रेत्याला खंडणीसाठी धमकावण्यात आले. त्याला मारहाण करून गोडाऊनची तोडफोड करण्यात आल्याची घटना नढेनगर काळेवाडी येथे घडली.
या प्रकरणी विक्रेत्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला फोन करून “तू नारळाचा व्यवसाय करतोस आणि तुझ्या गाड्या गोडाऊनसमोर लावतोस, त्यासाठी खंडणी म्हणून साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील” असे सांगितले. आरोपीने ऑनलाइन माध्यमातून ९० हजार रुपये घेतले. त्याने फिर्यादीच्या गोडाऊनच्या गेटवर दगड मारून आणि ॲरो ॲक्वा प्लांटचे नळ तोडून नुकसान केले आहे. इतर आरोपींनी फिर्यादीला लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला. आरोपी मोटारीमधून गोडाऊनच्या आतमध्ये जबरदस्तीने आले आणि फिर्यादीला शिवीगाळ करून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एका व्यक्तीने हातातील बिअरची बाटली फिर्यादीच्या दिशेने उगारून “आताच पैसे दे नाहीतर तुला बघून घेऊ” अशी धमकी दिली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.
सांगवीत पिस्तुल बाळगणारा अटकेत
बेकायदेशीररित्या पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी एकाला सांगवी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (२८ जुलै) दुपारी विशाल नगर, पिंपळे निळख येथे करण्यात आली.
कुणाल शिवाजी पुरी (वय २०, धायरी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस शिपाई रवी पवार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल पुरी याने त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्तुल बाळगले. त्याबाबत गुन्हे शाखा युनिट चारला माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.