पिंपरी : नागरिकांच्या भेटीसाठी राखीव असलेल्या वेळेत आणि आयुक्त महापालिकेत नसताना बाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी फैलावर घेतले. ‘तुम्हाला लहान मुलांसारखे वारंवार सांगायचे का, काेणी कधीही येतो, कधीही जातो, यापुढे कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर नसलेल्या अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नाेटीस दिली जाईल’, असा इशारा सिंह यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत मागील साडेतीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. नगरसेवक नसल्याने विविध समस्या, प्रश्न साेडविण्यासाठी नागरिकांना थेट अधिकाऱ्यांकडे यावे लागते. महिन्यातून दोनवेळा होणाऱ्या जनसंवाद सभेतही प्रश्न सुटत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस दुपारी तीन ते सहा ही वेळ नागरिकांच्या भेटीसाठी जाहीर केली.
या वेळेत सर्व विभागप्रमुखांनी दालनात उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. मात्र, सोमवारी आयुक्त सिंह हे महापालिकेत नव्हते. आयुक्त नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही विभागाचे विभागप्रमुख नागरिकांना भेटण्याच्या वेळेत महापालिकेत उपस्थित नव्हते. त्यामुळे तक्रार निवारणासाठी आलेल्या नागरिकांचा हेलपाटा झाला. याबाबत नागरिकांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती.
आयुक्त सिंह यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अति वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वच अधिकाऱ्यांना खडेबाेल सुनावत फैलावर घेतले. ‘तुम्हाला लहान मुलांसारखे वारंवार सांगायचे का, काेणी कधीही येतो, कधीही जातो.’ असे म्हणत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. मी महापालिका मुख्यालय सोडताना, शहराबाहेर जाताना नगरविकास विभागाच्या सचिवांना कळविताे. तर, तुम्हाला कळविण्यास काय हरकत आहेत. यापुढे कार्यालयीन वेळेत कार्यालयाबाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. संबंधित अति वरिष्ठ अधिकारी असला तरी ‘कारणे दाखवा नाेटीस देण्यात येणार आहे,’ असा इशाराही आयुक्तांनी दिला.