महाराष्ट्रातील एक अनोखा प्रेम विवाह नुकताच पिंपरी-चिंचवड शहरात पार पडला आहे. ट्रान्सवूमन आणि ट्रान्समेन हे दोघे विवाह बंधनात अडकले आहेत. रूपा टाकसाळ आणि प्रेम लोटलीकर अशी दोघांची नावं आहेत. त्यांचा प्रेमविवाह झाला आहे असे ते अभिमानाने सांगतात. ट्रान्सवूमन आणि ट्रान्समेन यांच्यातील झालेला विवाह सोहळा हा महाराष्ट्रातील पहिलाच असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रूपा पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. तर, प्रेम लोटलीकर हा देखील ग्रीन मार्शलमध्ये कार्यरत आहे. या अगोदर दोघे ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. रुपाला वाढदिवसाच्या दिवशी प्रेमने प्रपोज केलं होतं. आपण जुलै महिन्यात विवाह करायचा अशी शपथ दोघांनी घेतली होती. त्यानुसार, १७ जुलै रोजी त्यांचा विवाह थाटात संपन्न झाला आहे. 

… तिथं दोघे एकत्र आले, त्यांची ओळख झाली –

रूपा टाकसाळ ही मेल टू ट्रान्सवूमन झालेली आहे. तर, प्रेम हा फिमेल टू ट्रान्समेन झालेला आहे. अशात त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. दोघांची ओळख एक ते दीड वर्षांपूर्वी ठाणे येथे झाली. पुण्यातील ट्रान्सजेंडर दवाखान्यात रूपा काम करायची. प्रेम देखील ठाण्यातील ट्रान्सजेंडर दवाखान्यात काम करत असत. त्या निमित्ताने त्यांचं तीन दिवसांच प्रशिक्षण ठाण्यात आयोजित करण्यात आलं होतं, तिथं दोघे एकत्र आले, त्यांची ओळख झाली. ओळखीच रूपांतर मैत्रीत झालं. दोघे ही फोनवरून एकमेकांशी बोलायचे. प्रेम रूपाच्या प्रेमात कधी पडला त्याच त्याला कळलाच नाही.

प्रेमने रुपाला प्रपोज केलं, लग्नाची मागणी घातली –

डिसेंबर महिन्यात रूपाचा वाढदिवस असतो त्यानिमित्ताने प्रेमने रुपाला प्रपोज केलं, लग्नाची मागणी घातली. तेव्हा, जग आपल्याला काय म्हणेल असा मनात विचार आला. परंतु, सर्व बंधन झुगारून आम्ही १७ जुलै रोजी विवाह करण्याच ठरवलं. तसा योग जुळूनही आला असे रूपाने सांगितलं आहे. या प्रेमविवाहाला प्रेमच्या घरच्या व्यक्तींचा विरोध होता. तो झुगारून प्रेम आणि रूपा एकत्रित आले आहेत.

समाजात तृतीयपंथी, ट्रान्समेन, ट्रान्सवूमन यांना महत्वाचं स्थान दिलं जात नाही. ते, मिळावं आम्ही देखील माणूस आहोत जगण्याचा अधिकार आम्हाला देखील आहे. अशी भावना रूपाने व्यक्त केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri transwomen and transmen got married msr 87 kjp