पिंपरी : पुढे जाण्यासाठी रस्ता न देता वेडीवाकडी मोटार चालवित असल्याने मागील मोटारचालकाने हॉर्न वाजविला. त्याचा राग आल्याने समोरील मोटारचालकाने खाली उतरून मागील चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावले. तसेच त्याच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी तळवडे रस्त्यावरील त्रिवेणीनगर येथे घडली.विकी विजय भालेकर (वय ३६, रा. तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी हे मारुंजी येथून मित्र प्रनिकेत जगताप आणि अनिकेत चौधरी यांच्यासमवेत मोटारीमधून घरी परतत होते. तळवडे रस्ता येथे समोरून जाणारी मोटार वेडीवाकडी वळणे घेत जात होती. त्यामुळे विकी यांचा मित्र अनिकेत यांनी हॉर्न वाजविला. त्या कारणावरून आरोपींनी त्यांची मोटार रस्त्यात आडवी लावली. तिघेजण खाली उतरले. एकाने विकी यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. त्यांना आणि अनिकेतला शिवीगाळ, तसेच हाताने मारहाण केली. पिस्तुलाच्या मुठीने अनिकेतच्या डोक्यात मारले. तसेच एका आरोपीने विकी यांच्या कंबरेला असलेले पिस्तूल हिसकावून घेतले. तर, एकाने गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

कंत्राट घेतल्याने जिवे मारण्याची धमकी

ॲटलास कॉपको कंपनीचे वाहतुकीचे कंत्राट घेतल्याने सहा जणांच्या टोळक्याने एकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना चार जुलै रोजी सायंकाळी खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या भावाने ॲटलास कॉपको या कंपनीचे वाहतुकीचे कंत्राट घेतले आहे. या कारणावरून आरोपींनी फिर्यादीच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून दहशत निर्माण केली. त्यानंतर फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. एका व्यक्तीने फिर्यादीला कंपनीचे काम करू नको म्हणून फोन करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.