पुणे : स्वारगेट परिसरात रिक्षाचालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना सुलभ प्रवास करताना अडचणी निर्माण होत असून सुरक्षिततेवरही परिणाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवह महामंडळ (पीएमपी) आणि उप प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी पथक स्थापन करून संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

बसस्थानकांपासून ५० मीटर परिसरात रिक्षा थांबवण्यास मनाई असताना, रिक्षाचालकांकडून बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ, परिसरात, थांब्यांजवळ बिनधास्त रिक्षा उभ्या करून व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे स्थानकात प्रवेश करताना किंवा बस आल्यानंतर बसमध्ये चढताना-उतरताना अडथळा, वाहतूक कोंडी, भांडणे, वादावादी आणि अपघातजन्य परिस्थिती निर्माण होत आहे.

याबाबत प्रवासी, बसचालक आणि प्रवासी मंचाकडून सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी पीएमपीच्या वाहतूक विभागाचे तीन पर्यवेक्षकीय अधिकारी आणि एक आरटीओ अधिकारी असा समावेश असलेली दोन पथके स्थापन केली. पुणे आणि पिंपरी चिंडवड शहरात या पथकांची नेमणूक करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार या संयुक्त पथकाने ऑक्टोबर महिन्यात स्वारगेट, पुणे स्टेशन, येरवडा, रामवाडी मेट्रो स्थानक, वाकडेवाडी बस स्थानक आणि कात्रज चौक परिसरातील बसस्थानकांबाहेर पाहणी सुरू केली. त्यानुसार १५ रिक्षाचालकांवर कारवाई करून सुमारे २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने परिपत्रकाद्वारे जाहीर केली.

पथकाने केलेली कारवाई

ठिकाण – कारवाई संख्या – वसूल रक्कम

स्वारगेट मुख्य स्थानक – २ – ४,०००

पुणे स्थानक, येरवडा,

रामवाडी, वाकडेवाडी – ८ – १६,०००

कात्रज चौक स्थानक – ५ – ७,०००

एकूण – १५ – २७,०००

बस स्थानकांच्या ५० मीटर परिसरात रिक्षा किंवा खासगी वाहने उभी करू नयेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या सुसूत्रतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे. – पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी