पुणे : गुरुवार पेठेतील फुलवाला चौक परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत जुगार अड्ड्याच्या चालकासह २३ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी जुगार अड्डयाचा चालक अमोल बाळासाहेब आंदेकर (वय ४५, रा. फुलवाला चौक, गुरुवार पेठ), मनोज ढावरे (रा. तळजाई वसाहत, पद्मावती), शकील शेख (रा. मोमीनपुरा, गंज पेठ), रवींद्र रामभाऊ पवार (वय ५५, रा. रविवार पेठ) यांच्यासह जुगार अड्ड्यावरील कामगार तसेच खेळणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलवाला चौक परिसरात मेन बाजार मटका अड्डा सुरू असून जुगार अड्ड्यावरील कामगार राजेश शेळकेर, शंतनु पंडीत, गजानन महाडिक, परशुराम कांबळे हे जुगार खेळणाऱ्यांकडून पैसे घेत होते. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत रोकड, १३ मोबाइल संच, चार दुचाकी असा पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, मोहिते, शिंदे, इरफान पठाण, कांबळे आदींनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार तीन प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सहभागी झाले होते.