पुणे : ‘पोलीस २४ तास काम करतात. त्यांना चांगल्या सुविधा दिल्या, तर ते नागरिकांना न्याय देतील. पोलिसांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध असून, पोलिसांनी सामान्यांना द्यावा’, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे पोलिसांकडून पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘तरंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी विविध गीते सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत हाेते. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक, सहकार मंत्री मुरलीर मोहोळ, नगरविकास विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुनीत बालन ग्रुपचे संचालक पुनीत बालन, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, प्रवीणकुमार पाटील, अरविंद चावरिया या वेळी उपस्थित होते. या वेळी फडणवीस यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, संदीपसिंग गिल, संदीप भाजीभाकरे, तसेच पोलीस दलात चांगली कामगारी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते ‘काॅप २४’ या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, ‘पुणे शहर आंतराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे शहर आहे. विविध देशांतील नागरिक शहरात येतात. शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांंकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना राज्य शासनाकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी ‘काॅप २४’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शहरात २४ तास गस्त घालण्यात येणार असून, पोलिसांना वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्या, तर ते नागरिकांना न्याय देतील.’
‘सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना ‘१९४५’ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शासनाकडून पोलिसांना अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.’

‘पोलिसांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही’

या कार्यक्रमात शहरातील एका सराफी पेढीतून चोरीला गेलेले १७ किलो सोन्याचे दागिने सराफ व्यावसायिकाला परत करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘पोलिसांना बरीच कामे असतात. कायदा-सुव्यवस्था, बंदोबस्त, मोर्चा, आंदोलन, गंभीर गुन्ह्यांचा तपास करावा लागतो. नागरिकांनी त्यांचा मौल्यवान ऐवज जपावा. त्यासाठी आवश्यक त्या सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात. प्रत्येक वेळी पोलिसांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही.’

सोलापूरकर प्रकरणात योग्य ती कारवाई

राहुल सोलपूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत राज्य शासनाची भूमिका काय आहे, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी कार्यक्रमापूर्वी उपस्थित केला. फडणवीस म्हणाले, ‘या प्रकरणात शासनाने भूमिका घेण्याची गरज वाटत नाही. पोलिसांकडून या प्रकरणाची चाैकशी सुरू आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील.’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police should give justice to common people instruction of chief minister devendra fadnavis pune print news rbk 25 ssb