लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: सततची रस्ते खोदाई आणि पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असताना खड्डे दुरुस्तीला नादुरूस्त हॉटमिक्स प्रकल्पाचे विघ्न येत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून खड्डे बुजविण्याची प्रक्रिया ठप्प झाली असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शहराचा वाढलेला भौगोलिक विस्तार लक्षात घेता रस्ते दुरुस्तीसाठी डांबरमिश्रीत खडीसाठी महापालिका पूर्णपणे या हॉटमिक्स प्रकल्पावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. मात्र, खड्डे दुरुस्तीची प्रक्रिया ठप्प झाली आहे.

आणखी वाचा-पुणे मेट्रो सुसाट! प्रवासी संख्येत तब्बल सहापट वाढ

रस्ते आणि खड्डे दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या डांबरमिश्रीत खडीसाठी (हॉटमिक्स) येरवडा येथे हॉटमिक्स प्रकल्प महापालिकेकडून उभारण्यात आला आहे. शहराचे क्षेत्रफळ २५० चौरस किलोमीटर असताना या प्रकल्पामधून पुरेसे हॉटमिक्स उपलब्ध होत होते. मात्र, गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. महापालिका हद्दीत ३४ गावांच्या समावेशामुळे भौगोलिक क्षेत्र ५१९ चौरस किलोमीटर एवढे झाले आहे. त्यामुळे कच्चा माल तयार करण्याचा संपूर्ण भार हा येरवडा येथील हॉटमिक्स प्रकल्पावर आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीची वेळ आल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी प्रकल्प बंद पडत आहे. या आठवड्यात हा प्रकल्प दुसऱ्यांदा बंद पडला आहे. त्यामुळे रस्ते आणि खड्डे दुरुस्ती ठप्प झाली आहे.

या प्रकल्पामधून प्रतिदिन ५०० टन डांबरमिश्रीत खडी तयार केली जाते. महापालिकेचा पथ विभाग आणि १५ क्षेत्रीय कार्यालयाला प्रत्येकी १० टन या प्रमाणे १५० टन डांबरमिश्रीत खडी दिली जाते. पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर डांबरमिश्रीत खडीच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. सध्या पावसाची काही प्रमाणात उघडीप असल्याने खड्डे दुरुस्तीला गती येईल, असे वाटत असतानाच खड्डे दुरुस्तीला प्रकल्प नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे.

आणखी वाचा-प्रवाशांसाठी खूषखबर! पुण्यात मेट्रो स्थानकापासून घरापर्यंत शेअर रिक्षा

रस्त्यांवरील खड्डे सात दिवसांच्या आता बुजवावेत, असे आदेश महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिले आहेत. त्यानसार क्षेत्रीय कार्यालयांकडून खड्डे बुजविण्याला प्रारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी डांबर मिश्रीत खडीची मागणी करण्यात आली आहे. मात्र प्रकल्प बंद असल्याने ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून खड्डे दुरुस्ती थांबली आहे. येत्या दोन दिवसानंतरच खड्डे दुरुस्ती सुरू होण्याची शक्यता आहे.

नादुरुस्तीची दुसरी वेळ

गेल्या आठवड्यातही तांत्रिक कारणांमुळे हॉटमिक्स प्रकल्प बंद पडला होता. आताही प्रकल्पामधील बेअरिंग नादुरुस्त झाल्याने तो बंद आहे. तो दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहराच्या विविध भागात हॉटमिक्स प्रकल्प उभारण्याचे नियोजित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हॉटमिक्सच्या तंत्रज्ञानाही मोठे बदल झाले आहेत. येरवडा येथील हॉटमिक्स प्रकल्पामध्ये ते करणे काहीसे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे अनेक वेळा हा प्रकल्प बंद असतो.

प्रकल्प दुरुस्त करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत तो सुरू होईल. नव्याने प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. -शरद धारव, प्रमुख, हॉटमिक्स प्रकल्प, पुणे महापालिका