पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरातील स्वारगेट, मध्यवर्ती पेठांचा बहुतांश भाग, शिवाजीनगरचा काही परिसर, हिंगणे आणि सिंहगड रस्त्यालगत वीजपुरवठा कमी-जास्त दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विस्कळीत वीजपुरवठ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पावसामुळे अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असून, त्या दुरुस्त करण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाकडून (महावितरण) करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांत शहरातील बहुतांश ठिकाणी अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा होतो आहे. त्यामुळे घरगुती उपकरणे, विद्युत यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. गृहनिर्माण संस्था, उच्च इमारतींमध्ये विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पाणी भरणा करण्यासाठीच्या मोटार, उद्वाहन (लिफ्ट) बंद पडल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
मध्यवर्ती पेठेतील रहिवासी निरंजन काचे म्हणाले, ‘गेल्या दोन दिवसांपासून अचानक वीजपुरवठा खंडित होत आहे, तर कधी उच्च दाबाने वीजपुरवठा करण्यात येतो आहे. त्यामुळे घरातील उपकरणांमध्ये बिघाड होतो आहे. फ्रीजमधील अन्नपदार्थ खराब होत आहेत. गृहनिर्माण सोसायटीत मोटारी खराब झाल्याने पाण्याची कमतरता जाणवत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी लिफ्टमधून जाणेही धोक्याचे झाले आहे. घरातील उपकरणे बिघडल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यासोबतच स्वयंपाक करणेही गृहिणींसाठी कठीण झाले आहे.’
‘वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने शनिवारी (२६ जुलै) सोसायटीतील काही ज्येष्ठ नागरिक लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली. दोन दिवसांपासून वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. घरातील अनेक उपकरणे बंद पडत आहेत. अशा प्रकारे वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने दैनंदिन जीवन अवघड झाले आहे,’ अशी खंत आंबेगाव बुद्रुक परिसरातील रहिवासी सुरेश गोडबोले यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पावसाळ्यात अनेक कारणांनी वीज यंत्रणेत बिघाड होतात. त्यामुळे काही ठिकाणी अशा घटना घडतात. मात्र, अनेक भागांत देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. सुरळीत वीज पुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची वारंवार दुरुस्ती करण्यात येत असल्याचे ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले.
पुण्यासारख्या शहरात विजेच्या लपंडावाच्या घटना घडणे हा ‘महावितरण’कडून देखभाल-दुरुस्तीची कामे होत नसल्याचाच पुरावा आहे. वीज यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती वेळेवर आणि व्यवस्थित न झाल्यामुळेच नागरिकांना वारंवार त्रासाला सामोरे जावे लागते. – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच