पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने रद्द केलेल्या रावेत येथील ‘प्रधानमंत्री आवास योजने’तील निवड यादी आणि प्रतीक्षायादी एक व दोनमधील लाभार्थ्यांना, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर किवळे येथील आर्थिक दुर्बल प्रकल्पातील सदनिका देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब झाल्याने महापालिकेच्या वतीने रावेत येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात येत असलेला ९३४ सदनिकांचा गृहप्रकल्प रद्द करण्यात आला आहे. या प्रकल्पातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांना किवळे येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उभारलेल्या ७५५ सदनिका देण्यात येणार आहेत. या सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर वाटप करण्यात येणार आहेत. सदनिकेची किंमत १३ लाख ७१८ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये सदनिकेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या निवड व प्रतीक्षा यादीतील इच्छुक अर्जदारांनी ९ मेपर्यंत कागदपत्रांसह संमतीपत्र सादर करावे.

महापालिकेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांनाच किवळे येथील सदनिकांचे वाटप करण्यात येईल. तसेच, सदनिकेच्या हस्तांतरासंबंधी अंतिम निर्णयाचे सर्व अधिकार आयुक्तांकडे राहतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
चौकट

आवश्यक कागदपत्रांची यादी

सर्व कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड, अर्जदार व सहअर्जदाराचे पॅन कार्ड, अर्जदाराचा जातीचा दाखला, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, चालू महिन्याचे वीजबिल, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, भाडे करारनामा किंवा संमतीपत्र ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. चिंचवडगावातील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात ९ मेपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

किवळे येथील सदनिका मिळविण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थांच्या (एजंट) प्रलोभनास बळी पडू नये. ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी संमतिपत्राचा नमुना झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडून घेऊन जावा. कागदपत्रांसह तो सादर करावा. अण्णा बोदडे उपायुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pradhan mantri awas yojana beneficiaries in kivale must submit documents to get flats first come pune print news sud 02