देशात २१ मे हा दहशतवादविरोधी दिन. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची या दिवशी हत्या झाली. नुकताच झालेला पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे त्याला दिलेले प्रत्युत्तर याने दहशतवाद ही समस्या किती गंभीर आहे, याची जाणीव सर्वांना पुन्हा एकदा झाली. या पार्श्वभूमीवर ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’मधील संचालक मेजर जनरल (नि.) नितीन गडकरी यांच्याशी प्रसाद श. कुलकर्णी यांनी साधलेला संवाद.

दहशतवादाच्या आव्हानांचा सामना सुरक्षा दले करीत असताना नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी?

दहशतवादाचा सामना सरकार एका नीतीद्वारे करीत असते. सुरक्षा दलेही एका सुनियोजित पद्धतीने दहशतवाद्यांचा निःपात करीत असतात. या साऱ्या रणनीती सर्वांसमोर उघड करता येत नाहीत. लोकांनी सरकार आणि सुरक्षा दलांच्या पाठीशी कसलीही शंका उपस्थित न करता भक्कमपणे उभे राहावे. सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना लोकांचा भक्कम पाठिंबा असेल, तर दहशतवादी आपले काहीही वाकडे करू शकणार नाहीत. दहशतवादाच्या बाबतीत आपण कुठे आहोत, याचा विचार केला, तर एक नक्की लक्षात घ्यावे लागेल, की कलम ३७० रद्द केल्यानंतर दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत. सुरक्षा दले आपले कर्तव्य बजावत असताना नागरिकांनीही एक जबाबदार नागरिक म्हणून राहिले पाहिजे. असे म्हणतात, की If you want the soldier fight for you, be worth the man fight for नागरिकांनी आपले कर्तव्य बजावत राहिले पाहिजे.

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आली. मात्र, सुरक्षा या विषयाच्या बाबतीत अधिक जागरूकतेची गरज आहे का?

आपल्याकडे सुरक्षा, दहशतवाद या विषयावर अधिक जागरूकतेची गरज नक्की आहे. दहशतवादी घटना घडल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येतात. मात्र, दहशतवाद म्हणजे नक्की काय, याची संकल्पनात्मक पातळीवरील माहिती समजून घेण्यात नागरिकांमध्ये फारशी जागरूकता दिसत नाही. संरक्षण क्षेत्रातील जागरूकतेबाबत उदाहरणच द्यायचे झाले, तर संरक्षण तंत्रज्ञान हा विषय पुण्यातील ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीसारख्या (डीआयएटी) अतिशय कमी संस्थांमध्ये शिकविला जातो. हा विषय अधिकाधिक ठिकाणी शिकवून त्याची व्याप्ती वाढवायला हवी. देशप्रेमाचे संस्कार घरातूनच व्हायला हवेत. घरातून देशप्रेमाचे बीज रोवले, तर मोठेपणी त्याचे वृक्षात रूपांतर नक्कीच होईल.

दहशतवाद म्हणजे फक्त हिंसाच, की आणखी काही?

  • दहशतवादाचे रूप आज वेगळे आहे. जो लोकांना मारतो, तोच फक्त दहशतवादी नसतो. दहशतवादी विचारसरणीचा प्रभाव एखाद्याच्या मानसिकतेवर पडावा, यासाठी प्रयत्न करणाराही दहशतवादीच असतो. आपण काय करीत आहोत, ते का करीत आहोत, आपल्यासमोर काही ध्येय आहे का हे आपल्याला माहीत असायला हवे. देशभक्ती, देशप्रेम ही भावना प्रत्येकात असायला हवी. तसे चित्रपटही तयार व्हायला हवेत. आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भेद नकोत. धर्म, जातीवरून भेदभाव नुकसानच करते.

सार्वजनिक ठिकाणी लोकांनी काय काळजी घ्यायला हवी?

  • दहशतवादाचे संकट आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. बाहेरून आलेले दहशतवादी आपल्या आसपासही असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहून, आपण कोणाशी बोलत आहोत, काय बोलत आहोत, याची एक जबाबदार नागरिक म्हणून जाणीव ठेवणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला कोण राहते, बाहेर वावरताना एखाद्या व्यक्तीचे वागणे संशयास्पद तर नाही ना, याकडे लक्ष हवे. आपली पोलीस दले आणि संरक्षण दले मजबूत आहेत. नागरिकांनी सुरक्षेच्या बाबतीत अधिक जागरूकता दाखवून काही संशयास्पद बाबी दिसल्या, तर पोलिसांना हेल्पलाइन क्रमांकावर लगेच माहिती दिली पाहिजे. मीच कशाला पुढाकार घेऊ, मला काय त्याचे, ही भूमिका उपयोगाची नाही. आपल्या घरापर्यंत संकट येत नाही, तोपर्यंत काही करणार नाही, अशी भूमिका चुकीची असते. अशामुळे देश धोक्यात येऊ शकतो. आपण एक असू, सुरक्षेच्या बाबतीत जागरूक असू, तर दहशतवादी काहीही करू शकणार नाहीत. आसपास होणाऱ्या घडामोडींकडे नागरिकांनी बारकाईने पाहणे महत्त्वाचे ठरते.