लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : घाऊक बाजारात बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असून, घेवड्याच्या दरात अल्पशी वाढ झाल्यााची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, गुजरात, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, राजस्थानातून २ टेम्पो गाजर, हिमाचल प्रदेशातून ५ ते ६ ट्रक मटार, कर्नाटकातून २ टेम्पो भुईमूग शेंग, तसेच २ टेम्पो पावटा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून ९ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ६५० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १०ते १२ टेम्पो, कांदा ७५ ते ८० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४५ ते ५० ट्रक बटाट्याची आवक झाली.

कोथिंबिर, शेपू, कांदापातीच्या दरात वाढ

कोथिंबिर, कांदापात, राजगिरा, चुका, शेपूच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली. चाकवत, पुदिना, मुळे, चुका, चवळई, पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. तरकारी विभागात कोथिंबीर एक लाख जुडी, मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १००० ते १२००, मेथी – १२०० ते १५००, शेपू – ८०० ते १२००, कांदापात- ८०० ते १२००, चाकवत – ४०० ते ६००, करडई- ३०० ते ६००, पुदिना – ३०० ते ५००, अंबाडी – ३०० ते ५००, मुळे – ८०० ते १२००, राजगिरा- ४०० ते ५००, चुका – ६०० ते ८००, चवळई- ३००-६००, पालक- ८००- १२००

पपई, डाळिंबाच्या दरात घट

पपई, डाळिंबाच्या दरात घट झाली आहे. संत्र्याच्या दरात वाढ झाली. लिंबू, अननस, कलिंगड,चिकू, मोसंबी, पेरूचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी २५ ते ३० टन, संत्री १५ ते २० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ४० ते ५० टेम्पो, खरबूज २५ ते ३० टेम्पो, चिकू दोन हजार खोकी, पेरू २०० ते २५० प्लास्टिक जाळी (क्रेट), अननस ६ ट्रक अशी आवक झाली. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prices of most fruits and vegetables remain stable slight increase in wholesale prices of ghevda pune print news rbk 25 mrj