पुणे : शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंद सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी गेल्या साडेतीन वर्षांत तब्बल ७३ कोटी ४० लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले आहे. घरफोडीच्या दाखल गुन्ह्यांच्या प्रमाणात गुन्हे उघड होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. साडेतीन वर्षांत चोरीला गेलेल्या ऐवजापैकी पोलिसांना चोरट्यांकडून अवघा १३ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात यश आले आहे.

पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली आहे. त्यानुसार २०२२ ते जून २०२५ या साडेतीन वर्षांत चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांतील सोसायट्यांत शिरून, सदनिकांचे कुलूप तोडून तब्बल ७३ कोटी ६० लाख ४७ हजार ९८७ रुपयांचा ऐवज लांबविला. यात सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, तसेच अन्य ऐवजाचा समावेश आहे.

दोन हजार गुन्हे; ८८६ गुन्ह्यांचा छडा

गेल्या साडेतीन वर्षांत शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत घरफोडीचे दोन हजार १९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांपैकी ८८६ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ४३.८८ आहे. पोलिसांना निम्म्यापेक्षा अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावता आलेला नाही. जून २०२५अखेर २०५ घरफोड्या शहरात झाल्या आहेत. त्यांपैकी ६७ घरफोड्यांचा छडा लावून चोरट्यांना पकडण्यात यश आले. घरफोडीच्या उर्वरित गुन्ह्यांतील चोरटे पसार आहेत.

घरफोडीचे गुन्हे वाढण्यामागील कारणे

शहराचा विस्तार वाढत आहे. नोकरी, रोजगाराच्या शोधातून परगावाहून अनेक जण शहरात वास्तव्यास येतात. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी संधी असल्याने अनेक जण उपनगरात स्थायिक झाले आहेत. नोकरीनिमित्ताने अनेक जण व्यग्र असतात. सकाळी बाहेर पडल्यानंतर घरी परतायला रात्री उशीर होतो. चोरटे सोसायटीत शिरतात. बंद सदनिकांची पाहणी करून चोरटे घरफोडी करतात. गेल्या काही दिवसांत भरदिवसा घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. सर्वाधिक घरफोड्या पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचमध्ये झाल्या आहेत. या भागात कोंढवा, हडपसर, बिबवेवाडी, वानवडी, उंड्री या भागाचा समावेश होतो. गेल्या साडेतीन वर्षांत परिमंडळ पाचमधील उपनगरांत ८२२ घरफोड्या झाल्या आहेत. त्यांपैकी ३३४ घरफोड्यांचा छडा लावण्यात यश आले आहे.

घरफोडीचे गुन्हे

वर्ष दाखल गुन्हे उघड गुन्हे            चोरलेला ऐवज                         जप्त ऐवज

२०२२ ६११ २६७ ३१ कोटी ३३ लाख ३४ हजार ५ कोटी ९२ लाख ८ हजार

२०२३ ६०९             ३९९             २३ कोटी १७ लाख ७० हजार ३ कोटी ७७ लाख

२०२४ ५२८            २९३             १२ कोटी ५० लाख ७२ हजार ३ कोटी ६७ लाख ५९ हजार

२०२५ २७१             ६७             ६ कोटी ५८ लाख ६९ हजार            ७४ लाख ३१ हजार

(२०२५ ची आकडेवरी जूनअखेरपर्यंत)

पोलिसांच्या सूचना

– घरात शक्यतो मौल्यवान ऐवज ठेवू नका

– कामानिमित्त बाहेर जाताना शेजाऱ्यांना माहिती द्या

– सोसायटीतील सुरक्षारक्षकाची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून नेमणूक करा

– सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

– प्रत्येकाची नोंद करूनच सोसायटीत प्रवेश द्या

– चांगल्या दर्जाचे कुलूप (लॅच लाॅक) वापरावे