पुणे : साखळी ओढून रेल्वे थांबवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वेकडून अशा प्रवाशांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. मार्चअखेर सरलेल्या आर्थिक वर्षात रेल्वेच्या पुणे विभागात साखळी ओढून रेल्वे थांबवण्याच्या तब्बल एक हजार ४०४ घटना घडल्या आहेत. दिवसाला अशा सरासरी चार घटना घडत आहेत. या प्रकरणी एक हजार १६४ प्रवाशांना अटक करून ३ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वे गाड्यांमध्ये केवळ आपत्कालीन वापरासाठी ‘अलार्म चेन पुलिंग’ म्हणजेच साखळी ओढून गाडी थांबवण्याची सुविधा दिलेली असते. अनेक वेळा प्रवासी आपत्कालीन प्रसंगाऐवजी त्यांच्या सोईसाठी साखळी ओढून गाडी थांबवतात. साहजिकच त्यामुळे गाडीला उशीर होऊन इतर प्रवाशांची गैरसोय होते. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत पुणे विभागात साखळी ओढून गाडी थांबवण्याच्या एक हजार ४०४ घटना घडल्या आहेत. हे प्रमाण दिवसाला सुमारे चार आहे. मागील आर्थिक वर्षात विनाकारण साखळी ओढणाऱ्या एक हजार १६४ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मागील काही काळात प्रवाशांकडून साखळी ओढून गाडी थांबवण्याच्या घटना वाढल्या आहेत. स्थानकावर सहप्रवाशाला पोहोचण्यास उशीर झाला आणि गाडी पुढे मार्गस्थ झाली, की प्रवासी साखळी ओढत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. एखाद्या स्थानकावर गाडीला थांबा नसेल तर तिथे उतरण्यासाठी अथवा चढण्यासाठी प्रवासी साखळी ओढत असल्याचे प्रकारही वाढले आहेत. साखळी ओढून गाडी थांबवण्याच्या सुविधेचा गैरवापर होत असल्याने रेल्वेने अशा प्रवाशांवर कडक कारवाई केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी विनाकारण साखळी ओढून रेल्वे थांबवू नये, असे रेल्वेने म्हटले आहे.

विनाकारण साखळी ओढण्याचे तोटे

– गाडी थांबवण्यात आल्याने तिला पुढे पोहोचण्यास विलंब

– एक गाडी थांबल्याने पाठीमागून येणाऱ्या गाड्याही उशिराने धावतात

– एका प्रवाशासाठी गाडीतील शेकडो प्रवाशांची गैरसोय – रेल्वेच्या यंत्रणांना नाहक त्रास होऊन कामकाजावर परिणाम

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pulling the chain stops the train 1 thousand 164 people arrested during the year pune print news stj 05 ysh