पुणे : पुणे महापालिकेकडून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. यात शून्य ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ लस दिली जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या मोहिमेत ३ लाखांहून अधिक बालकांना लस दिली जाणार आहे.
महापालिकेच्या हद्दीत शून्य ते ५ वयोगटातील बालकांसाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ५४ दवाखाने, १९ प्रसूतिगृहे व ६५ नवीन आरोग्यवर्धिनी केंद्रे अंतर्गत बूथ स्थापन करून, तसेच वीटभट्ट्या, स्थलांतरित वस्त्या, बांधकाम सुरू असलेली ठिकाणे, अतिजोखमीचे भाग या ठिकाणी लसीकरण मोहीम १२ ऑक्टोबरला राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत १ हजार ३५० पोलिओ बूथद्वारे शून्य ते ५ वयोगटातील ३ लाख १२ हजार ७५५ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या लसीकरणानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी १३ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत घरोघरी जाऊन पोलिओ डोस घेतल्याची खात्री करणार आहेत. शहरातील १० लाख ४० हजार २३२ घरांना भेटी देऊन बूथवर डोस दिला गेल्याची खात्री करून घेतली जाणार आहे. या मोहिमेत १५ मुख्य पर्यवेक्षक, ३१४ पर्यवेक्षक, १ हजार ९१२ पथके याखेरीज मुख्यालय स्तरावरून लस सनियंत्रक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, सहायक आरोग्य अधिकारी व आरोग्य अधिकारी यांचे नियंत्रण असणार आहे.
आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी परिमंडळ वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. क्षेत्रीय व परिमंडळ कार्यालयनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्रवासात असणाऱ्या बालकांनाही पोलिओ लस देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यासाठी बस स्थानके, एसटी स्थानके, मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके, विमानतळ आणि उद्याने या ठिकाणी पथके नेमण्यात येणार आहेत. – डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका
पोलिओ लसीकरण मोहीम
१२ ऑक्टोबर : पोलिओ लसीकरण
वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ५
१३ ते १७ ऑक्टोबर : घरोघरी जाऊन बालकांना लस मिळाल्याची तपासणी