पुणे : विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या एक हजार १२ बेशिस्त वाहनचालकांवर विमानतळ वाहतूक विभागातील पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई केवळ एकाच दिवसात करण्यात आली आहे.
विमानतळ परिसरातील रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करणे, वेगात वाहने चालवणे, उलट्या दिशेने प्रवास करणे, अनधिकृत ठिकाणी (नो पार्किंग) वाहने लावणे अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. याचा परिणाम हवाई प्रवाशांबरोबरच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) दौऱ्यांचे नियोजन करताना अडथळे येत आहेत. त्यामुळे विमानतळ वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती लोहगाव विमानतळ वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली.
कदम म्हणाले, ‘पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीसंदर्भात अनेक उपाययोजना केल्या असताना वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. रात्रीच्या वेळी हाॅटेल, मद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असून, परिसरात बेशिस्त वाहनचालकांकडून वेगाने वाहने चालवली जात असल्याने अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत वाढत्या तक्रारींमुळे वाहतूक पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. नगर रस्ता, येरवडा, वडगावशेरी, कोरेगाव पार्क, विमाननगर या परिसरातील रस्त्यांवर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.’
परिसराच्या हद्दीत एका दिवसात तब्बल एक हजार १२ वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून संबंधितांवर कारवाई करण्यात आली. कारवाई करताना छायाचित्र किंवा चित्रिफितीद्वारे पुरावे गोळा करण्यात आले आणि सर्व प्रकरणांवर ई-चलन प्रणालीद्वारे दंड आकारण्यात आला. मोहीम सुरू होण्यापूर्वी नियंत्रण कक्षाला याबाबत सूचित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही वाहतूक कोंडी झाली नाही आणि रस्त्यावरील वाहनांचा प्रवाह सुरळीत राहिल्याने अशी मोहीम वेळोवेळी राबविण्यात येणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
सुरळीत वाहतुकीसाठी विविध उपाययोजना
वाहनचालकांना वाहतुकीचे नियम समजावे म्हणून त्यांना समुपदेशन, ठिकठिकाणी माहिती दर्शविणारे फलक, एकेरी, दुहेरी रांग, वेग मर्यादा दर्शविणारे डिजिटल फलक याबाबत नियोजन सुरू आहे. लवकरच या मार्गावरील वाहतूक सुरळीत करून हवाई प्रवाशांना सुरळीत प्रवास करता येईल, असे रवींद्र कदम यांनी सांगितले.