पुणे : पुणे शहराजवळील प्रस्तावित वर्तुळाकर मार्गासाठी अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या सातबाराचे उतारेस तसेच ‘आठ अ’ उताऱ्याच्या प्रतीसाठी लाच मागणाऱ्या तीन महिला तलाठ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभगााकडून (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला. हवेली तहसीलदार कार्यालयासमोर नुकतीच ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी हवेली तालुक्यातील सांगरुण, बहुली, खडकवाडी गावच्या तलाठी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदाराला खडकवासला परिसरातील सांगरुण, बहुली, खडकवाडी, कुडजे या गावांच्या हद्दीतील जमीन खरेदी विक्री करण्यासाठी जमिनीच्या सात बारा तसेच ‘आठ अ’ उताऱ्याचे संगणकीकृत आणि हस्तलिखित साक्षांकित प्रती हव्या होत्या. या भागातून प्रस्तावित वर्तुळाकर मार्ग जाणार आहे. त्यासाठी ते सांगरुण, बहुली तसेच खडकवाडी, कुडजे येथील महिला तलाठ्यांना भेटले.

सांगरुण गावातील त्यांना आवश्यक असलेल्या सात बारा आणि ‘ आठ अ’ उताऱ्याच्या २४० प्रतीसाठी शासकीय शुल्का व्यतिरिक्त १६ हजार ४०० रुपयांची लाच मागण्यात आली. बहुली गावातील १०६ प्रतींसाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त चार हजार ९१० रुपयांची लाच, तसेच खडकवाडी, कुडजे गावातील ३२ प्रतींसाठी १५२० रुपयांची लाच मागण्यात आली. त्यानंतर व्यावसायिकाने तक्रार नोंदविल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली. लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे याप्रकरणाचा तपास करत आहेत.