पुणे : शहरातील रस्त्यांवर बेकयदा पद्धतीने अतिक्रमण करून तसेच पत्राशेड टाकून बांधकाम करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयासह हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई करून महापालिकेने गुरुवारी ती काढून टाकली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख संदीप खलाटे यांनी सांगितले.

येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या म्हस्के वस्ती ते फुलेनगर व विश्रांतवाडी ते फाईव्ह नाईन चौक येथील पदपथावरील तसेच फ्रंट व साईड मार्जिनमध्ये अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. परिमंडळ १ चे उपायुक्त माधव जगताप, सहाय्यक आयुक्त अशोक भंवरी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या कारवाईत १८ बिगारी सेवक, ३ ट्रक, आणि एक जेसीबीच्या साह्याने अतिक्रमणे काढण्यात आली. सुमारे चार हजार चौरस फुटांवरील कच्चे आणि पक्के शेड पाडण्यात आले. तर, ३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत गेल्या चार दिवसांपासून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर रस्ता, सासवड रस्ता, काळेपडळ, चिंतामणीनगर, मोहमंदवाडी, हांडेवाडी या भागातील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, पोलिस, हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण निरीक्षक राकेश काची, सहायक निरीक्षक कुणाल मुंढे, साईनाथ निकम,अभिलाष कांबळे यांनी ही कारवाई केली. यामध्ये १८ हातगाड्या, ११० पथारी, इतर १०४, ३९ शेड, १ स्टॉल, २ काउंटर व ३ सिलिंडर जप्त करण्यात आले.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील बेकायदा पथारी व्यावसायिकांसह पत्राशेड, बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींनुसार विविध भागांत कारवाई केली जात आहे. – संदीप खलाटे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग.