पुणे : कोरेगाव पार्क भागात भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी बहीण जखमी झाली. या प्रकरणी पोलिसांनी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अजिंक्य राजू गायकवाड (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात अनुष्का राजू गायकवाड ही गंभीर जखमी झाली. याबाबत अजिंक्यचे वडील राजू (वय ४८) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटारचालक आकाश गायकवाड (वय २५, रा. शाहू मोडक उद्यानाजवळ, कोरेगाव पार्क) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अजिंक्य गायकवाड आणि त्याची बहीण अनुष्का ४ ऑगस्ट रोजी रात्री कोरेगाव पार्क भागातील ब्ल्यू डायमंड हाॅटेल चौकातून निघाले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार अजिंक्य आणि सहप्रवासी अनुष्का यांना धडक दिली. अपघातात अजिंक्य आणि अनुष्का जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या अजिंक्यचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मोटारचालक आकाश गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड तपास करत आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पादचारी मुकेश चव्हाण (वय २१) याला बाणेरमधील राधा चौकात भरधाव वाहनाने धडक दिली होती. अपघातात चव्हाण याचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणात पोलिसांनी नुकताच अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. बाणेर पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. तपासात अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी चव्हाण याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.
दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना कोंढवा भागात घडली. समीर ऐजाज शेख (वय ४८, रा. जे. के. पार्क, कोंढवा खुर्द) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नााव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार समीर शेख हे १ ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास कोंंढव्यातील सोमजी चौकातून निघाले होते. त्यावेळी भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीस्वार समीर हे दुभाजकावर आदळले. अपघातात समीर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करत आहेत.