पुणे : ‘फलटण येथील यशवंत बँकेत दीडशे कोटींचा घोटाळा झाला असून, त्यामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा मुख्य सहभाग आहे. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून बोगस कंपन्यांमार्फत कराड येथील अनेक लोकांची फसवणूक केली असून, लेखापरीक्षण अहवालातही घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या घोटाळ्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत चौकशी करून शेखर चरेगावकर यांच्यासह दोषी संचालकांना अटक करावी,’ अशी मागणी खासदार प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

‘या प्रकरणाची दखल घेऊन सहकार आयुक्तांनी त्वरित कारवाई करावी, अन्यथा सहकार आयुक्त कार्यालयात बँकेचे ठेवीदार आणि कर्जदारांना घेऊन घेराव घालण्यात येईल,’ असा इशाराही त्यांनी दिला. ॲड. नीलेश जाधव, गणेश पवार, एस. डी. कुलकर्णी आदी बँकेचे ठेवीदार आणि कर्जदारही पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाल्या, ‘चरेगावकर यांनी अनेकांच्या नावावर बोगस कर्जे काढली असून, अनेकांना जामीनदार केले आहे. ही कर्जे थकीत आहेत. कर्जाचे पैसे हस्ते-परहस्ते बोगस कंपन्यांमध्ये वळविण्यात आले आहेत. सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांनी स्वत:चा आणि कुटुंबाचा फायदा करवून घेतला आहे. बँकेतील पैशांचा विनियोग खासगी मालमत्ता घेण्यासाठी करण्यात आला आहे. स्वत:च्या पदाचा दुरुपयोग करून खोटी कर्ज प्रकरणे करून त्यांनी बँकेचेही नुकासन केले आहे.’

धमकी दिल्याचा आरोप

‘बँकेच्या २३० कोटींच्या ठेवी आहेत. मात्र, गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांच्या ठेवी अडचणीत आल्या आहेत. बँकेतील आर्थिक अनियमिततेबाबत तीन अहवाल आले आहेत. या संदर्भात माझ्या संपर्कात असलेल्या ठेवीदारांना शेखर चरेगावकर यांचे बंधू शार्दूल यांच्याकडून धमकावले जात आहे. सहकार खात्यातील अधिकाऱ्यांवरही कारवाई न करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मलाही ‘या प्रकरणात गप्प बसा, अन्यथा तुमचे गेल्या वेळी तिकीट कापले, तसे पुढेही पाहून घेऊ,’ अशी धमकी दिली गेली,’ असा आरोप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला.

भाजपअंतर्गतच संघर्ष?

बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. भाजपच्याच राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्याविरोधात आरोप केल्याने हा भाजपअंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. चरेगावकर भाजपच्या एका मंत्र्याचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी दोन दिवसांपूर्वी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन कुलकर्णी यांचे सर्व आरोप फेटाळले होते. तसेच, कोणत्याही चौकशीला सामारे जाण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले होते.