लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटारचालक अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल यांच्यासह सहाजणांना सात जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी शुक्रवारी दिले. सहा जणांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

आरोपींना तपासासाठी सात दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी तपासधिकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी केली होती. न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून आरोपींना १४ दिवस न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणात जामीन मंजूर करण्यात यावा, यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांकडून न्यायालयात अर्ज सादर करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-पुणे कार अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा जणांना ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन, तुकाईदर्शन, हडपसर), ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा), कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा), ब्लॅक पबचे वस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी (२४ मे) संपली. त्यानंतर त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

‘मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस’, अशी सूचना विशाल अगरवाल यांनी दिली होती. याबाबतचा जबाब अगरवाल यांच्या मोटारीवरील चालकाने पोलिसांना दिला होता. ब्लॅकमधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना मद्य पुरविल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर पब मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या वतीने ॲड. एस. के जैन, ॲड. सुधीर शहा, ॲड. अमोल डांगे, ॲड. अमेय गोऱ्हे, ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

आणखी वाचा-Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने त्यांच्या चालकाला पैशांचं आमिष दिलं आणि सांगितलं, आरोप..

अगरवालच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण

याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून, तपासात प्रगती झाली आहे. अगरवालकडून मोबाइल संच जप्त करण्यात आला आहे. मोबाइलचे सायबर तज्ज्ञांकडून तांत्रिक विश्लेषण करण्यात येणार आहे. अगरवालच्या समक्ष विश्लेषण करायचे असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील विद्या विभूते यांनी न्यायालयाकडे केली.

बंगल्यातील चित्रीकरणात छेडछाड

अगरवालच्या बंगल्यात नोंदवही ठेवण्यात आली होती. सुरक्षारक्षकांकडून बंगल्यात ये-जा करणाऱ्यांची नोंद ठेवण्यात येत होती. घटनेच्या दिवशी अगरवालचा अल्पवयीन मुलगा बंगल्यातून रात्री बाहेर पडला होता. याबाबतची नोंद होती. बंगल्यातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. चित्रीकरणात छेडछाड करण्यात आल्याचे सरकारी वकील विभूते यांनी सांगितले. त्यादृष्टीने सखोल तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.

आणखी वाचा-पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्याची कान चित्रपट महोत्सवात ऐतिहासिक कामगिरी…

शासनाची फसवणूक; पोलिसांकडून कलमवाढ

अगरवालने परदेशी बनावटीची महागडी मोटार खरेदी केली. मोटारीची प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी करण्यात आली नाही. नोंदणी शुल्क न भरता मोटारीचा वापर करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अगरवालविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी कलमवाढ केली. मोटार वाहन कायद्यातील काही कलमांसह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.