पुणे : गावस्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नसल्याने क्लस्टर पद्धतीने (समूह) असे प्रकल्प उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशानसाने घेतला आहे.
जिल्ह्यातील वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकरणामुळे घनकचऱ्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर त्याचे व्यवस्थापन करणे अडचणीचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालीनी कडू, नगरपालिका शाखेचे सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास, खेडचे उपविभागीय आयुक्त अनिल दौंडे, चाकण एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत चाकण नगरपालिका आणि एमआयडीसी लगतच्या कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कुरळी-खराबवाडी, खालुंब्रे, म्हाळुंगे, निगोजे, मोई तसेच आंबेठाण या ग्रामपंचायतींचा क्लस्टरमध्ये समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा उपलब्धता, अपेक्षित खर्च तसेच गावनिहाय निर्माण होणारा दैनंदिन घनकचरा याबाबत माहिती बैठकीत देण्यात आली. त्यानंतर सर्व संबंधित ग्रामपंचायतींच्या एकत्रित सहभागातून क्लस्टर पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी पुढील कार्यवाहीचे सविस्तर नियोजन करण्यात आले.